आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. ही मालिका श्रीलंकेत पार पडत आहे. मालिकेतील पहिला सामना हंबनटोटा येथे 22 ऑगस्ट रोजी पार पडला होता. हा सामना पाकिस्तान संघाने 142 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तसेच, 24 ऑगस्ट रोजी खेळला गेलेला दुसरा सामनाही पाकिस्तानने 1 विकेटने जिंकला. यानंतर पाकिस्तानच्या नावावर असा विक्रम रचला गेला, जो आजपर्यंत जगातील कुठल्याच संघाला करता आला नाही.
पाकिस्तानचा भीमपराक्रम
पाकिस्तान संघाने दुसरा सामना जिंकताच वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. पाकिस्तान संघ तटस्थ ठिकाणी 100हून अधिक द्विपक्षीय वनडे सामने खेळणारा एकमेव संघ बनला आहे. पाकिस्तानने तटस्थ ठिकाणी 101 वनडे सामने खेळले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तान आहे. या संघाने तटस्थ ठिकाणी 38 द्विपक्षीय वनडे सामने खेळले आहेत. 24 वनडे सामन्यांसह भारतीय संघ यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, श्रीलंकेने तटस्थ ठिकाणी 22 वनडे सामने खेळले आहेत.
तटस्थ ठिकाणी सर्वाधिक द्विपक्षीय वनडे सामने खेळणारे संघ
101- पाकिस्तान*
38- अफगाणिस्तान
24- भारत
22- श्रीलंका
20- ऑस्ट्रेलिया
20- आयर्लंड
18- वेस्ट इंडिज
श्रीलंका संघाच्या बसवरील हल्ल्यानंतर बदललं सगळं
पाकिस्तान संघाने 1973पासून आतापर्यंत 955 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 504 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तसेच, 421 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानमध्ये 2009मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला केला झाला होता. त्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानचा दौर करणे बंद केले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांचे अधिकतर सामने यूएई आणि श्रीलंकेत खेळले आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान तटस्थ ठिकाणी सर्वाधिक द्विपक्षीय वनडे सामने खेळणारा संघ बनला आहे.
दुसऱ्या सामन्याचा थोडक्यात आढावा
अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय प्राथमिकरीत्या योग्य ठरला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन केले. युवा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने 151 धावांचा पाऊस पाडला. इब्राहिम जादरान यानेही 80 धावांचे योगदान दिले. तसेच, मोहम्मद नबी याने 29 धावा केल्या. या खेळाडूंच्या योगदानामुळे अफगाणिस्तानने पाकिस्तानला 301 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, पाकिस्तानने हे आव्हान 1 चेंडू आणि 1 विकेट राखून 302 धावा करत पूर्ण केले. तसेच, मालिकाही खिशात घातली. पाकिस्तान मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 26 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे खेळला जाणार आहे. (record pakistan become 1st team to play 100 bilateral odis at neutral venue read here)
हेही वाचा-
पाच बॉल खेळून नसीम शाह ठरला हिरो! सलग दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा रोमहर्षक विजय
राशिद खानचा यू टर्न! देशासाठी ‘या’ लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय बदलला