---Advertisement---

भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 10:17 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गुरुवारपासून(४ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस तुफानी फलंदाजीने गाजवला. त्याने भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत शतकी खेळी केली. त्याच्या शतकामुळे भारताला या पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळाले. त्यामुळे त्याचे सध्या कौतुक होत आहे.

रिषभ ज्यावेळी फलंदाजीला आला, तेव्हा भारताने केवळ ४१ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे दबावाची परिस्थिती होती. त्यातच पंतबरोबर अजिंक्य रहाणे ३९ धावांची आणि रोहित शर्मा ४१ धावांची भागीदारी करुन बाद झाले. त्यामुळे त्याच्यावर इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २०५ धावांचा टप्पा पार करुन देत भारताला आघाडीवर घेऊन जाण्याची जबाबदारी होती.

त्यानेही ही जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत समर्थपण पेलली. त्याने सुंदरसह ११३ धावांची भागीदारी केली. दरम्यान, त्याने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्यामुळे भारताला आघाडी मिळवण्यात यश आले. त्याच्या शतकामुळे दिवसाखेर भारताने ७ बाद २९४ धावा उभारल्या. तसेच भारताने ८९ धावांची आघाडीही घेतली.

त्यामुळे पंतचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याने ट्विट केले की  ‘तो किती अफलातून आहे? दबावाखाली अविश्वसनीय खेळी. ही त्याची अशी पहिली खेळी नव्हती आणि शेवटचही नव्हती. भविष्यात तो सर्व क्रिकेट प्रकारातील सर्वकालिक खेळाडूंपैकी एक असेल. अशाच आक्रमक शैलीत फलंदाजी करत राहा, म्हणूनच तू एक मॅचविनर आणि खास खेळाडू आहेस.’

गांगुली २०१९ सालच्या आयपीएल हंगामावेळी दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता. त्यावेळी त्याने आणि पंतने एकत्र वेळ घालवला होता. कारण पंतही दिल्लीकडून आयपीएलमध्ये खेळतो.

https://twitter.com/SGanguly99/status/1367802452070658051

पंतने अँडरसनला मारला रिव्हर्स स्वीप

रिषभ पंत ८९ धावांवर खेळत असताना अँडरसन डावातील ८३ वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी अँडरसनने वेगाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर पंतने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला आणि चेंडू सीमापार गेला. विशेष म्हणजे २०१४ सालानंतर अँडरसनविरुद्ध कसोटीत रिव्हर्स स्वीप किंवा पुलचा फटका मारणारा पंत हा पहिलाच फलंदाज आहे. त्यामुळे पंतच्या या फटक्याचे खूप कौतुकही झाले.

https://twitter.com/flintoff11/status/1367789617546661892

अँडरसननेच संपवला झंझावात 

अँडरसनना ८३ व्या षटकात रिव्हर्स स्वीप मारल्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंतने जो रुटला षटकार खेचत शतक पूर्ण केले. हे मात्र, अखेर त्याचा हा झंझावात ८५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अँडरसननेच संपवला. अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर पंत रुटकडे झेल देऊन बाद झाला. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ

रिषभ पंतचा कहर! स्मिथला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये आला दुसऱ्या स्थानी

‘IPLचा हिशोब कसोटीत पूर्ण करतायत,’ रोहितला बाद देणं पंचांना पडलं महागात; झाले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---