---Advertisement---

“वेंकटेशच्या गोलंदाजीने भविष्यासाठी रोहितचा आत्मविश्वास वाढला असेल”

On: सोमवार, नोव्हेंबर 22, 2021 9:10 PM
v-iyer
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. भारताचा युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने उत्कृष्ट प्रदर्शन केले. अय्यरने या सामन्यात तीन षटके गोलंदाजी देखील केली. त्याच्या गोलंदाजी प्रदर्शनाबाबत भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उथप्पाच्या मते अय्यरने केलेल्या प्रदर्शनानंतर कर्णधार रोहित शर्माला येणाऱ्या काळासाठी आत्मविश्वास मिळेल.

वेंकटेश अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि स्वतःला सिद्ध केले. त्याने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तीन षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये १२ धावा देत एक महत्वाचा विकेटही घेतला. यानंतर रॉबीन उथप्पाने वेंकटेशच्या या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.

एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना उथप्पा वेंकटेशच्या गोलंदाजीविषयी म्हणाला की, “ज्याप्रकारे वेंकटेश अय्यरने गोलंदाजी केली, त्यामुळे रोहितला पूर्ण आत्मविश्वास मिळेल. तो येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत गोलंदाजी देऊ शकतो. ज्याप्रकारे त्याने आज गोलंदाजी केली, त्यामुळे त्याने खूप प्रभावित केले आहे.”

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने मर्यादित २० षटकात सात विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघ १७.२ षटकात १११ धावा करून सर्वबाद झाला. भारतासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. या विजयानंतर भारतीय संघाने ही टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. अक्षर पटेलला या सामन्यात सामनावीर निवडले गेले तर रोहित शर्माला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी, वेंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये त्याचे फ्रेंचायझी क्रिकेटमधील पदार्पण केले होते. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आणि त्याच पार्श्वभूमीवर वेंकटेशला हर्दिक पंड्याच्या जागेवर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजीमध्येही चांगल्या प्रकारचे प्रदर्शन केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---