क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
७४ वर्षीय रॉड मार्श हे बुंडाबर्ग येथे बुल्स मास्टर्स चॅरीटी ग्रुपच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे अँब्युलन्सची वाट न पाहाता बुल्स मास्टर्सचे अधिकारी जॉन ग्लेनविल आणि डेविड हिलियर यांनी त्यांना बुंडाबर्गच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे सध्या समोर आले आहे.
डेलिटेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार बुल्स मास्टर्सचे प्रमुख जिम्मी माहेर यांनी सांगितले की, ‘जॉन आणि डेवला बरेच श्रेय जाते कारण डॉक्टरांनी सांगितले की, जर अँब्युलन्सची वाट पाहिली असती, तर उशीर झाला असता.’ रॉड यांना कारमधून प्रवास करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता.
रॉड मार्श यांची कारकिर्द
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी यष्टीरक्षकांमध्ये रॉड मार्श यांची गणना होते. ते ऑस्ट्रेलियाचे तिसरे सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहेत. त्यांनी १९७० ते १९८४ असे १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केले. या १४ वर्षात त्यांनी ९६ कसोटी आणि ९२ वनडे सामने खेळले. त्यांनी ९६ कसोटीत ३ शतके आणि १६ अर्धशतकांसह ३६३३ धावा केल्या. तसेच त्यांनी वनडेत ४ अर्धशतकांसह १२२५ धावा केल्या.
त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे ४७९ विकेट्सही घेतल्या आहेत. यात ४६३ झेल आणि १६ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. ते ऑस्ट्रेलियाचे ऍडम गिलख्रिस्ट (९०५) आणि इयान हेली (६२८) यांच्यानंतर यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक आहेत.
रॉड मार्श यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५७ सामने खेळले असून ११०६७ धावा केल्या आहेत, तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी १४० सामन्यांत २११९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधाराचा ‘हा’ सल्ला आला कामी, इशानने श्रीलंकेविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीचे श्रेय दिले रोहितला
मराठमोळ्या ऋतुराजसाठी कर्णधार रोहित करणार त्याग? इशानसोबत युवा फलंदाजाला पाठवणार सलामीला