भारत आणि इंग्लंड यांचा दरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला २२७ धावांनी लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी घेतली आहे. भारतीय फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. तसेच भारताच्या सलामीवीरांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची सलामी जोडी बदलण्याचा पर्याय खुला झाला आहे.
भारतीय सलामीवीर ठरले अपयशी
चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी भारतासाठी सलामीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, दोघांनाही पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात भारतीय संघाला चांगली सलामी देण्यात अपयश आले. रोहित-शुबमन जोडीने पहिल्या डावात १९ तर दुसऱ्या डावात २५ धावांची सलामी दिली. त्यामुळे, भारताच्या मध्यक्रमावर दडपण आले आणि परिणामी भारत दोन्ही डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून वंचित राहिला.
रोहित शर्माचा खराब फॉर्म
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात १२ धावा काढल्या. त्याआधी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या दोन कसोटीतही चांगल्या सुरुवातीनंतर त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.
दुसरा सलामीवीर शुबमन गिल हा सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. परंतु, अर्धशतकाचे रूपांतर शतकात करण्यात त्यालाही यश लाभले नाही. २१ वर्षीय गिलने पहिल्या कसोटी सामन्यात २९ धावा आणि ५० धावांची नोंद केली होती.
भारतीय संघासमोर आहेत पर्याय खुले
रोहित व शुबमन यांची जोडी सातत्याने अपयशी ठरली तर भारतीय संघाकडे त्यांचा पर्याय म्हणून इतर खेळाडू सज्ज आहेत. केएल राहुल व मयंक अगरवाल हे सलामीवीर म्हणून भारतीय संघासोबत आहेत. मात्र, मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटल्याप्रमाणे, पुढील काही सामन्यात तरी शुबमन व रोहित यांच्या जोडीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता