मंगळवार रोजी (२० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा तेरावा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. चांगल्या सुरुवातीनंतरही मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या आणि ९ गडी गमावत फक्त १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात शिखर धवन आणि स्टिव्ह स्मिथच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १९.१ षटकात सहज त्यांचे लक्ष्य पार केले. अशाप्रकारे ६ विकेट्सने दिल्लीने सामना जिंकला.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबईचा हा या हंगामातील दुसरा पराभव होता. दुसरीकडे सामना पराभवानंतर कर्णधार रोहितला आणखी एक धक्का बसला आहे. या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून रोहितला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
असा आहे नियम
कारण बीसीसीआयने असा नियम बनविला आहे की, आता प्रत्येक संघाने आपली २० षटके ९० मिनिटांत पूर्ण केली पाहिजेत. यापूर्वी २० वे षटक हे ९० व्या मिनिटाला सुरु करावे असा नियम होता, परंतु आता दीड तासाच्या आत निर्धारित २० षटके पूर्ण करावी लागणार आहेत. ९० मिनिटांत दोन्ही संघांना अडीच मिनिटांचा दोनदा टाईम आऊट मिळेल. म्हणजेच संघांना एकूण ८५ मिनिटांत २० षटके टाकावी लागणार आहेत. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये १४.११ षटके पुर्ण करायची आहेत.
पुन्हा चूक झाल्यास दंडाच्या रक्कमेत होणार वाढ
याबरोबरच षटकांची गती कमी राखल्यास पहिल्यांदा संबंधित संघाच्या कर्णधाराला १२ लाख रुपयांची शिक्षा केली जाईल. हेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट अर्थात २४ लाख रुपये इतकी असेल. याबरोबरच प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळालेल्या प्रत्येक खेळाडूलाही सामना फीच्या २५ टक्के (भारतीय चलनानुसार ६ लाख) दंड भरावा लागणार आहे.
एवढेच नव्हे तर, तिसऱ्यांदा असी चूक झाल्यास कर्णधाराला तब्बल ३० लाख रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. याबरोबरच त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात येईल. तसेच अंतिम ११ जणांच्या पथकातील सर्व खेळाडूंना सामना फीच्या ५० टक्के म्हणजे १२ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
DC vs MI : मुंबई पलटणवर दिल्लीचे शिलेदार भारी, ६ विकेट्स राखून केला पराभव
अरर थोडक्यात वाचला! पहिल्याच षटकात हार्दिकने टिपला धवनचा अप्रतिम झेल, पण… पाहा व्हिडिओ