भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 37वा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 243 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. 35व्या वाढदिवशी शतक ठोकणाऱ्या विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने विराट कोहलीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली.
विराटमुळे भारत 300च्या पार
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त सुरुवात केली होती. मात्र, 100 धावांच्या आतच भारताला रोहित (40) आणि शुबमन गिल (23) यांच्या रूपात धक्के बसले होते. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहली याने श्रेयस अय्यर याच्यासोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. श्रेयस (77) अर्धशतक करून बाद झाला.
मात्र, विराट शेवटपर्यंत टिकला. त्याने सामन्यात 121 चेंडूंचा सामना करत नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. विराटने या धावा करताना 10 चौकारही मारले. त्याच्या या शतकी खेळीमुळे भारत निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावांपर्यंतची मजल मारू शकला. अशात रोहितने सामन्यानंतर विराटबद्दल केलेले विधान चर्चेत आहे.
काय म्हणाला रोहित?
रोहितने यावेळी खेळपट्टीवर खेळणे कठीण असल्याचे सांगितले. त्यामुळे विराटसारखा खेळाडू खेळपट्टीवर असणे महत्त्वाचे असल्याचे त्याने विधानातून सांगितले. रोहित म्हणाला की, “खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती. त्यामुळे तुमच्याकडे विराट कोहलीसारखा खेळाडू हवा, जो अशा खेळपट्टीवर मजबूतीने उभा राहील.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1721186512409379274
भारताचा पुढील सामना
भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 8 विजय मिळवले आहेत. आता भारताचा आणि स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. अशात भारतीय संघ हा सामनाही जिंकण्याचा प्रयत्न करेल. (Rohit Sharma on Virat Kohli said this must read here cwc 2023 INDvsSA)
हेही वाचा-
जडेजाचे विराटच्या खेळीबाबत मोठे विधान; म्हणाला, ‘कोहलीचे हे शतक…’
लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराट आणि श्रेयस…’






