टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली 26 वर्षीय सरफराज खाननं टीम इंडियासाठी डेब्यू टेस्ट मॅच खेळली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सरफराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती.
या मालिकेत सरफराजनं उत्तम कामगिरी केली. रोहितनंही त्याच्या कामगिरीचं खूप कौतुक केलं आहे. सरफराजशिवाय रोहितच्या नेतृत्वाखाली युवा यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनीही भारतासाठी कसोटी पदार्पण केलं. या युवा क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर रोहित शर्मा खूप खूश आहे. त्यानं या मुलांसोबत दीर्घकाळ खेळता यावं अशी इच्छा व्यक्त आहे.
रोहित शर्मानं एका मुलाखतीत खुलासा केला की, तो सरफराज खानच्या वडिलांसोबतही खेळला आहे. TEAM45RO ला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला, “मी खूप लहान असताना सरफराज खानच्या वडिलांसोबत ‘कांगा लीग’ मध्ये खेळलो आहे. त्याचे वडील डावखुरे फलंदाज होते. ते एक आक्रमक खेळाडू होते जे त्यावेळी प्रसिद्ध होते. मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की गेल्या काही वर्षात त्यांनी दिलेल्या इनपुटमुळे सरफराज खान इथपर्यंत पोहोचला. सरफराजच्या यशात त्याच्या इतकीच त्याच्या वडिलांचीही मेहनत आहे.”
आम्ही तुम्हाला सांगतो, सरफराजचे वडील नौशाद 52 वर्षांचे आहेत. ते मुंबईकडून क्रिकेट खेळले आहेत. ‘कांगा प्रीमियर लीग’बद्दल बोलायचं झाल्यास, ही मुंबईतील एक क्रिकेट लीग आहे. ती अधिकृतपणे ‘डॉ. एचडी कांगा मेमोरियल क्रिकेट लीग’ म्हणून ओळखली जाते. सरफराजचे वडीलच नाही तर त्याचा भाऊ मुशीर खान हा देखील क्रिकेटपटू आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषक आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं होतं.
टीम इंडियाकडून खेळताना चमकदार कामगिरी करणारा सरफराज खान आगामी आयपीएलमध्ये मात्र खेळताना दिसणार नाही. आयपीएल 2024 पूर्वी झालेल्या लिलावात त्याच्यावर एकाही संघानं बोली लावली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
पंच वृंदा राठी यांची ऐतिहासिक कामगिरी, असं करणाऱ्या बनल्या देशातील पहिल्या महिला
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची अयोध्येतील राम मंदिरात पूजा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर; राशिद खानची मोठी झेप, सूर्यकुमारचं अव्वल स्थान कायम