---Advertisement---

RR vs GT: वैभव सूर्यवंशीला बाद करण्यासाठी 207 सामन्यांच्या अनुभवाचा वापर! व्हिडिओ पाहाच

On: रविवार, मे 10, 2026 11:01 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज विरोधी संघांना हैरान करत आहे. त्याने अनेक नवख्या आणि अनुभवी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले आहे. या हंगामाचा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने आपल्या २०७ सामन्यांच्या अनुभवाचा वापर करत वैभवला बाद केले.

या १५ वर्षाच्या फलंदाजासाठी गुजरातने कसे काय आपला २०७ सामन्यांचा अनुभवाचा वापर केला, हे जाणून घेऊ. ज्याप्रकारे वैभव गुजरातविरुद्ध फलंदाजी करत होता, ते पाहून तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात होता आणि सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. त्याची विकेट ही दोन संघांमध्ये मोठा फरक घडवणारी होती.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यांच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या सालामीवीर जोडीने सातत्य राखत ११८ (६५) धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन ५५ धावा (३६) आणि कर्णधार शुबमन गिल ८४ धावा (४४) करत बाद झाले. त्यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. यामुळे गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २२९ धावसंख्या उभारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला पहिला झटका लवकर लागला, यशस्वी जायस्वाल ४ चेंडूंत ३ धावा करत बाद झाला. दुसरीकडे वैभवचे तुफान सुरू झाले. त्याने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्याचा हा शॉट पाहून गुजरातचे खेळाडूही चकित झाले. सिराजने पुढच्याच चेंडूवर पुनरागमन केले, त्याने यॉर्कर टाकत वैभवला जखमी केले. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबला.

मैदानात परतल्यावर वैभवने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. त्याने राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटाकात सिराजला पहिल्या चार चेंडूंवर तीन चौकार मारले. सिराज निराश दिसला, मात्र पुढे त्याने ज्याप्रकारे चेंडू टाकला ते अप्रतिम होते. सिराजने त्याच षटकातील पाचवा चेंडू १४६.६ किमी प्रतितास वेगाने टाकला. त्या बाउन्सरवर वैभव बाद झाला. त्याला या बाउन्सरची अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्याने शॉट खेळण्यास थोडा उशिर केला.

वैभवला बाद करण्यासाठी २०७ आयपीएल सामन्यांचा अनुभव लागला. त्यापैकी ८८ सामने मैदानाबाहेरचे आणि ११९ सामने मैदानावरील होते. लागोपाठच्या तीन चौकारानंतर सिराज निराश झाला होता, तेव्हा डगआउटमध्ये बसलेले गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी त्याला शांत राहण्यास आणि आपल्या ठरलेल्या योजनेनुसार गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांनी सिराजला डोके वापर असा इशारा केला आणि सिराजने नेमके तेच केले. वैभवला शॉट मारण्यासाठी अचूक वेळ साधता न आल्याने तो अर्शद खानच्या हाती झेल देत बाद झाला. त्याआधी त्याने १६ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३६ धावा केल्या.

गुजरातकडून राशिद खानने प्रभावी कामगिरी केली. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही २.३ षटकांत १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. रबाडाने २ तर सिराजने महत्वपूर्ण एक विकेट घेतली. राजस्थानकडून वैभवनंतर रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३८ धावा केल्या. बाकी फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी १६.३ षटकांत सर्व विकेट्स गमावल्या आणि केवळ १५२ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी हा सामना ७७ धावांनी गमावला. या

सामन्यात राजस्थानचे नेतृत्व जायस्वालने केले होते. नियमित कर्णधार रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---