---Advertisement---

IPL 2026: आरसीबीलाही झुकवलं! राजस्थान रॉयल्सचा विजयी चौकार, सूर्यवंशी-जुरेलची वादळी खेळी

On: शनिवार, एप्रिल 11, 2026 8:46 AM
---Advertisement---

आयपीएल 2026 च्या 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या विजयासह राजस्थानने सलग चौथा सामना जिंकत गुणतालिकेत आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. दुसरीकडे, आरसीबीला या हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावांचा भक्कम स्कोर उभारला. कर्णधार रजत पाटीदारने 40 चेंडूत 63 धावांची दमदार खेळी केली. विराट कोहलीने देखील 16 चेंडूत 32 धावा करत वेगवान सुरुवात दिली. वेंकटेश अय्यरने अखेरच्या टप्प्यात नाबाद 29 धावा करून संघाचा स्कोर 200 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, रवि बिश्नोई आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

202 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात काहीशी डळमळीत झाली आणि यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच षटकात 13 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत सामना पूर्णपणे बदलून टाकला. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकत आरसीबीच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण केला. वैभवने 26 चेंडूत 78 धावांची विस्फोटक खेळी करत 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले.

वैभव आणि ध्रुव जुरेल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची वेगवान भागीदारी झाली. वैभव बाद झाल्यानंतर हेटमायर आणि कर्णधार रियान पराग झटपट बाद झाले. मात्र ध्रुव जुरेलने संयमी आणि आक्रमक खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. जुरेलने 43 चेंडूत नाबाद 81 धावा करत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. अखेरीस रविंद्र जडेजासोबत 68 धावांची नाबाद भागीदारी करत राजस्थानने 18 षटकांत 4 विकेट्स गमावून 202 धावा पूर्ण केल्या.

क्रुणाल पांड्याने आरसीबीसाठी 2 बळी घेतले, मात्र शेवटच्या टप्प्यात संघाला थांबवण्यात अपयश आले. राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकत आयपीएल 2026 मध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---