सध्या पुण्यात महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड ‘पुणेरी बाप्पा’ संघाचं नेतृत्व करतोय. शुक्रवारी (7 जून) रत्नागिरी जेट्सविरुद्धच्या सामन्यात तो त्याच्या विचित्र रनआउटमुळे चर्चेत आला.
ही घटना पुणेरीच्या डावाच्या 12व्या षटकात घडली. गोलंदाज योगेश चव्हाणनं या षटकातील पहिला चेंडू फुल लेन्थ टाकला, जो गायकवाडनं मिड-विकेट आणि लाँग-ऑनमध्ये खेळला. यानंतर त्यानं एक धाव पटकन पूर्ण केली आणि तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला. दरम्यान, क्षेत्ररक्षकानं चेंडू विकेटकीपरच्या दिशेनं फेकला. चेंडू पकडताच कीपरनं स्टंप्स उडवले आणि अंपायरकडे रन आऊटसाठी अपील केलं. मैदानावरील अंपायरनं तिसऱ्या पंचाची मदत घेतली. रिप्ले पाहिल्यावर दिसून आलं की, कीपरनं चेंडू पकडला तेव्हा गायकवाडची बॅट क्रीजपर्यंत पोहोचली होती.
मात्र इथे एक ट्विस्ट आहे. बॅट क्रिजमध्ये पोहचायच्या आधीच ऋतुराजचा पाय बॅटला लागला, ज्यामुळे बॅट त्याच्या हातातून निसटली. नेमकं त्याचवेळी कीपरनं स्टंप्स उडवले. यावेळी ऋतुराजच्या शरीराचा कोणताही भाग क्रीजमध्ये नव्हता, त्यामुळे त्याला रनआउट घोषित करण्यात आलं. अशाप्रकारे आऊट झाल्यानंतर गायकवाडही निराश दिसत होता. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Ruturaj gets run out in an unfortunate way 😱#MaharashtraPremierLeague#JioCinemaSports#MPLonJioCinema #MPLonSports18 pic.twitter.com/IvEDVKMs6j
— Sports18 (@Sports18) June 7, 2024
बाद होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं 15 चेंडूत 29 धावा केल्या होत्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. या सामन्यात ‘पुणेरी बाप्पा’नं प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांत सर्व गडी गमावून 144 धावा केल्या. पुणेरीकडून पवन शहा (32) यानं सर्वाधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात, रत्नागिरीनं 2 चेंडू बाकी असताना 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.
पुणेरी बाप्पाचा स्पर्धेतील हा तिसरा पराभव ठरला. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाचा विजयाचा चौकार
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाचा दुसरा विजय
पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ