सचिन तेंडुलकर, हे नाव जे बहुतेक विश्वचषकाच्या रेकॉर्ड बुकमध्ये आढळते. मास्टर ब्लास्टरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण एक सामना असा होता ज्याने त्याचे मन दुखावले होते. या सामन्यात एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या सचिनला कर्णधार राहुल द्रविडमुळे माघारी परतावे लागले होते. यामुळे सचिन फार निराश झाला होता. या मुद्द्याबाबत त्या काळात सामन्याचा भाग असलेल्या आकाश चोप्राने खुलासा केला आहे.
2004 साली सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार भागीदारी केली होती. एकीकडे सेहवागने 309 धावा करून पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला होता, तर दुसरीकडे सचिनही पाकिस्तानी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या सामन्यात जखमी सौरव गांगुलीच्या जागी राहुल द्रविड कर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. दरम्यान, त्याने एक निर्णय घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या सामन्यात सचिन त्याच्या द्विशतकापासून फक्त 6 धावा दूर होता आणि कर्णधार द्रविडने डाव घोषित केला होता.
द्रविडच्या या निर्णयानंतर सचिन आणि त्याच्यात दुरावा आल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. त्यावेळी संघाचा एक भाग असलेल्या आकाश चोप्राने आता या मुद्द्यावर यूट्यूब चॅनल 2 स्लॉगर्सला सांगितले की, ‘मी ड्रेसिंग रूममध्ये होतो, पण मी त्या संभाषणाचा भाग नव्हतो. खरे सांगायचे तर, मी खूप लहान असल्यामुळे त्यात सामील होण्याचा प्रयत्नही केला नव्हता. होय, त्या दिवशी सचिनपाजी खूश नव्हते. मला वाटतं मी पहिल्यांदाच त्यांना उदास पाहिलं होतं. मी त्यांना आपल्या भावनांवरील नियंत्रण गमावताना कधीच पाहिले नव्हते आणि त्या दिवशी ते खरोखरच खूप संयमाने वागत होते. ते स्पष्टपणे नाखूष होते, काहीतरी बरोबर नव्हते.’
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ‘राहुलने फोन केला होता, पण त्या दिवशी दादा (गांगुली) देखील ड्रेसिंग रूमचा एक भाग होता. तो खेळत नव्हता, पण तो ड्रेसिंग रूममध्ये होता आणि मला खात्री आहे की तो थिंक टँकचा भाग होता. हा एकट्या कर्णधाराचा निर्णय नव्हता. खेळानंतर राहुल म्हणाला की, सामना 4 दिवसांत संपणार आहे हे माहीत असते तर त्याने डाव घोषित केला नसता.’
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीनंतर शिखर धवन पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये, स्पेशल टूर्नामेंटची तयारी सुरू
वनडे सामन्यातील पंचाला किती पगार मिळतो? पुरुष आणि महिला पंचांच्या पगारात किती आहे फरक?
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन