शनिवारी (22 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. सुपर 12 फेरीतील हा दुसरा आणि टी-20 विश्वचषक 2022 मधील 14 वा सामना होता. इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले आणि काही खास विक्रम देखील नावावर केले.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय संघातील गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. अफगाणिस्तान या सामन्यात अवघ्या 112 धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे अफगाणिस्तान संघाला 20 षटके खेळून देखील काढता आले नाहीत. इंग्लिश गोलंदाजांमध्ये सॅम करन (Sam Curran) सर्वात घातक ठरला. त्याने या सामन्यात सर्वात जास्त पाच विकेट्स घेतल्या. इंग्लंड संघाच्या टी-20 इतिहासातील हा पहिलाच पाच विकेट्सचा हॉल ठरला आहे.
सॅम करनच्या नावापुढे इंग्लंड संघासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनाची नोंद झाली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा कामगिरी यापूर्वी कोणत्याही खेळाडूने केली नव्हती, जी आता सॅम करन (Sam Curran) याने करून दाखवली आहे. या पाच विकेट्सच्या हॉलनंतर तो इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज बनला आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पाच विकेट्सचा हॉल घेतला आहे.
टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारीचा विचार केला, तर सॅम कर या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. श्रीलंका संघाचा माजी दिग्गज अजंथा मेंडिस (Ajantha Mendis) याच्या नावावर टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. मेंडिसने टी-20 विश्वचषकातील एका सामन्यात अवघ्या 8 धावा खर्च करून सहा विकेट्स घेतल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचाच रंजना हैराथ (Rangana Herath) आहे, ज्याने टी-20 विश्वचषकातील एका सामन्यात अवघ्या तीन धावा देत पाच विकेट्स घेतल्या होत्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुल (Umar Gul) आहे, ज्याने 6 धावा खर्च करून पाच विकेट्सचा हॉल घेतला होता. सॅम करन आता या दिग्गजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर सहभागी झाला आहे. शनिवारी बलाढ्य इंग्लंड संघासोबत खेळताना करनने अवघ्या 10 धावा खर्च केल्या आणि अफगाणिस्तानच्या 5 विकेट्स घेतल्या.
What a performance, Sammy! 🖐
Scorecard: https://t.co/g9Y8ib5KgT#T20WorldCup | @CurranSM pic.twitter.com/Tz7MMwAuFf
— England Cricket (@englandcricket) October 22, 2022
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन
6/8 – अजंथा मेंडिस
5/3 – रंजना हैराथ
5/6 – उमर गुल
5/10 – सॅम करन*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, ‘पाकिस्तानचा गोलंदाज खूपच…..’
लाजिरवाण्या पराभवानंतर व्यथित झाला ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच; आपल्याच खेळाडूंना म्हणाला...