कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना शुक्रवारी (२३ जुलै) झाला. या सामन्यात भारताकडून तब्बल ५ खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये संजू सॅमसनचा देखील समावेश आहे. संजू सॅमसनने या सामन्यातून पदार्पण करताना फलंदाजीची चांगली सुरुवात केली. मात्र, त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. असे असले तरी त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
सॅमसन या सामन्यात ४६ चेंडूत ४६ धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकले. त्याला प्रविण जयविक्रमाने अविष्का फर्नांडोच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे वनडेमध्ये पदार्पणाच्या सामन्यात ४० ते ४९ या दरम्यानच्या धावसंख्येवर बाद होणारा सॅमसन केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी अशोक मंकड आणि अजिंक्य रहाणे अशाप्रकारे बाद झाले आहेत. अशोक मंकड त्यांच्या वनडे पदार्पणात ४४ धावांवर, तर रहाणे ४० धावांवर बाद झाला होता.
वनडे पदार्पणासाठी ६ वर्षांची पाहिली वाट
संजू सॅमसनने ६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर वनडे पदार्पण करण्यासाठी त्याला तब्बल ६ वर्षे आणि ४ दिवसांची वाट पाहावी लागली आहे.
भारताचा डाव गडगडला
या सामन्यात भारताकडून संजू सॅमसन व्यतिरिक्त पृथ्वी शॉने ४९ धावांची, तर सुर्यकुमारने ४० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही प्रमुख भारतीय फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. तळात नवदीप सैनीने १५ आणि राहुल चाहरने १३ धावा करत थोडीफार लढत द्यायचा प्रयत्न केला. पण, तरी भारताचा डाव ४३.१ षटकात २२५ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून अकिला धनंजय आणि प्रविण जयविक्रमने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच दुशमंत चमिराने २ विकेट्स घेतल्या, तर दसून शनका आणि चमिका करुणारत्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने केले आचरेकर सरांना वंदन, शेअर केला भावनिक व्हिडिओ
Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व