---Advertisement---

थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 3:59 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे पहिला कसोटी सामना चालू झाला आहे. या सामन्यापुर्वी अक्षर पटेलच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर याला दुखापतीमुळे सामना खेळण्यापुर्वीच संघातून बाहेर पडावे लागले. त्यामुळे अक्षरऐवजी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम याला अंतिम ११ जणांच्या पथकात सहभागी करण्यात आले. यासह नदीमने जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले.

परंतु हा नदीमचा कसोटी कारकिर्दीतील अवघा दुसराच सामना असल्याने या अनुभवहीन गोलंदाजावर अनेकांनी टिकेची झोड उठवली होती. मात्र नदीमने अतिशय महत्त्वपर्ण विकेट घेत आपल्या टिकाकारांना जोरदार चपराक लगावली आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट सामन्याच्या पहिल्या दिवसापासून मैदानावर टिकून होता. धडाकेबाज फलंदाजी करत त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १२८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीही आपल्या फलंदाजीतील आक्रमकता कायम राखत त्याने द्विशतक पूर्ण केले. अखेर डावातील १५४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या नदीमने शेवटच्या चेंडूवर रुटला पायचित केले. यासह रुट २१८ धावा करत पव्हेलियनला परतला आणि सोबतच भारताला सहावी विकेटही मिळाली.

एवढेच नव्हे तर, रुटला बाद करण्यापुर्वी नदीमने विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्सचीही महत्त्वपुर्ण विकेट घेतली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टोक्सने अवघ्या ११८ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. तसेच रुटसोबत मिळून शतकी भागिदारीही रचली होती. अशात १२६.१ षटकात चेतेश्वर पुजाराच्या हातून स्टोक्सला झेलबाद करत नदीमने संघाला मोठे यश मिळवून दिले होते.

क्रिकेट कारकिर्दीत घेतल्या ७०० हून जास्त विकेट्स

फिरकी गोलंदाज असलेल्या शाहबाज नदीमला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त संधी मिळाली नाही. मात्र देशांतर्गत क्रिकटमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १७ वर्षांपूर्वी डिसेंबर २००४ मध्ये झारखंडकडून केरळ विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २ विकेट्स आणि २५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या सामन्यात झारखंडकडून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीही खेळत होता.

नदीमने मागील १७ वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तसेच त्याने भारत अ संघाकडून खेळतानाही चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. त्याने आत्तापर्यंत ११७ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फलंदाजी करताना २१९६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.

तसेच त्याने १०९ अ दर्जाच्या सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच देशांतर्गत टी२० लीगमध्ये १३४ सामन्यात ११० विकेट्स काढल्या आहेत. एवढेच नव्हे तर, आयपीएलमध्ये ७१ सामने खेळताना त्याने ४७ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. अर्थात नदीमने त्याच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत ७०० पेक्षा जास्त विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अररर! केवळ ५ षटकात टीम इंडियाने सोडले २ झेल, रनआऊटची संधी अन् २ रिव्ह्यूही गमावले

कमाल! कोणत्याच इंग्लंडच्या कर्णधाराला जे जमले नव्हते ते अखेर जो रुटने करुनच दाखवले

पाहुण्यांनी उडवली यजमानांची झोप! भारतात द्विशतक करणारे परदेशी कर्णधार, रुटचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---