चेन्नईला एम ए चिदंबरम स्टेडियमच्या बरोबर समोर असलेल्या घरात १९७६ साली त्याचा जन्म झाला. मद्रास क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसकडे जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळत तो लहानाचा मोठा झाला. त्यावेळी पुढे जाऊन आपण भारतासाठी क्रिकेट खेळू असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. बायोफिजिक्समध्ये पीएचडी असणारे वडील, गणित आणि रसायनशास्त्रात एमएससी असणारी आई असलेल्या त्याला जेनेटिक इंजिनियर व्हायचे होते. इयत्ता पहिली ते नववी दरवर्षी तो आपल्या वर्गात पहिला आला. क्रिकेटमध्ये कारकीर्द करायची असेल तर इंजिनियरिंगचा विचार डोक्यातून काढून टाक हा वडिलांनी दिलेला सल्ला त्याने मानला आणि बीकॉमला प्रवेश घेतला. तिथेही तिन्ही वर्षे फारसे कॉलेजला न जाताच तो बीकॉम पास झाला. काउंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये २२० बळींसह तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा खेळाडू म्हणजे मुरली कार्तिक.
लहान असताना तो सर गारफिल्ड सोबर्स यांच्या शैलीचे अनुकरण करत गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी आपली उंची कमी आहे हे लक्षात आल्यावर त्याने फिरकी गोलदांजीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. चेन्नईमध्ये जन्मलेल्या कार्तिकने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मात्र १९९२ मध्ये दिल्लीकडून केली. दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर त्यावेळी सरावाला येणाऱ्या बिशनसिंग बेदी, मनिंदरसिंग या गोलंदाजांचे मार्गदर्शन घेत त्याने आपले फिरकी गोलंदाजीचे कसब विकसित केले.
दिल्लीच्या १६ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात ७४ धावांत १० बळी मिळवले. त्याच्या वाढत्या वयामुळे तो दिल्लीच्या १६ वर्षाखालील संघामध्ये फार काळ खेळू शकला नाही आणि त्यापुढील टप्पा असलेल्या १९ वर्षाखालील संघामध्येही त्याला दिल्लीकडून स्थान मिळाले नाही. प्रयत्न करूनही दिल्लीच्या संघात स्थान मिळत नाही असे लक्षात आल्यावर कार्तिकने रेल्वेच्या संघाला जवळ केले आणि त्यांच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळू लागला. रेल्वेकडून खेळताना १९९४-९५ मध्ये आपल्या पहिल्या पाच सामन्यांत त्याने २४ बळी मिळवले. या कामगिरीमुळे त्याची मध्य विभागाच्या १९ वर्षाखालील संघामध्ये निवड झाली. पुढच्या वर्षीच्या हंगामात ७ सामन्यांत ३८ बळी मिळवत त्याने भारताच्या १९ वर्षाखालील संघामध्ये स्थान मिळवले. या संघाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ७ बळी मिळवले आणि २ एकदिवसीय सामन्यांत प्रत्येकी ३ बळी मिळवत संघाच्या विजयाला हातभार लावला.
रेल्वेच्या १९ वर्षाखालील संघासाठी चांगली कामगिरी केल्यानंतर १९९६-९७ च्या हंगामात कार्तिकला त्यांच्या रणजी संघात बढती मिळाली. विदर्भाविरुद्ध आपल्या दुसऱ्याच सामन्यात हॅटट्रिक घेत त्या डावात त्याने ६ बळी मिळवले. दुसऱ्या डावात आणखी ३ बळी मिळवत त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या आपल्या पहिल्या हंगामात कार्तिकने १६ बळी मिळवले. देशांतर्गत स्पर्धांच्या आपल्या दुसऱ्या हंगामात कार्तिकने पहिल्या ४ सामन्यांत १४ बळी मिळवले मात्र त्यानंतर त्याला संघातून वगळले गेले. या हंगामात फारशी चांगली कामगिरी न करताही पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघात त्याची निवड झाली. त्या दौऱ्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
रणजी करंडकाचा १९९८-९९ चा हंगाम कार्तिकसाठी लाभदायक ठरला. या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईच्या विजय क्रिकेट क्लबकडून स्थानिक सामन्यांत त्याने २३ बळी मिळवले. त्यानंतर रणजीच्या ७ सामन्यांत २९ बळी मिळवत त्याने दुलीप करंडकासाठी मध्य विभागाच्या संघात स्थान मिळवले. पश्चिम विभागाविरुद्ध अंतिम फेरीत ७ बळी मिळवत मध्य विभागाला दुलीप करंडक जिंकून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या कार्तिकची १९९९-२००० मध्ये विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघामध्ये निवड झाली. या दौऱ्यामध्ये कार्तिकने १८ बळी मिळवले. त्या वर्षीच्या रणजी हंगामात त्याने रेल्वेकडून ३ सामन्यांत १७ बळी मिळवले. या कामगिरीमुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी प्रथम अध्यक्षीय संघात आणि नंतर भारतीय संघात निवड झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत त्याने ६ बळी मिळवले. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी चांगले बूट नसल्याने आपण संजय बांगरचे बूट घालून खेळल्याची आठवण कार्तिक आजही सांगतो.
गोलंदाजांच्या प्रशिक्षणासाठी बीसीसीआयने २००० साली सुरु केलेल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या पहिल्या तुकडीमध्ये त्याला स्थान मिळाले. काही दिवसांतच बेशिस्तीच्या कारणावरून कार्तिक, हरभजन आणि निखिल हलदीपूर या तीन खेळाडूंची एनसीएमधून हकालपट्टी करण्यात आली. आपल्याला दुखापत झाल्याने आपण एनसीएमधून बाहेर पडलो असे स्पष्टीकरण नंतर कार्तिकने दिले.
त्या वर्षीच्या रणजी विजेत्या मुंबईविरुद्ध इराणी करंडक खेळणाऱ्या शेष भारत संघाकडूनही कार्तिक खेळला. या सामन्यात पहिल्या डावात मुंबईचे ४ बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ७० धावांत ९ बळी मिळवत मुंबईचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघाची दारे त्याच्यासाठी खुली झाली. बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघाविरुद्ध एकेक कसोटी खेळल्यांनतर कार्तिक पुन्हा एकदा संघातून बाहेर गेला.
बऱ्याचदा कर्णधाराच्या ‘गेम प्लॅन’मध्ये नसलेल्या खेळाडूंना गुणवंत असूनही संघाबाहेर बसावे लागते. कार्तिकच्या बाबतीतही हेच झाले. भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गांगुलीने त्याच्याऐवजी हरभजनला संघात स्थान दिले. अर्थात भज्जीनेही त्या मालिकेत ३२ बळी मिळवत आपली निवड सार्थ ठरवली. यानंतर पुन्हा भारतीय कसोटी संघामध्ये येण्यासाठी कार्तिकला तीन वर्षे वाट पाहावी लागली.
कसोटीतून बाहेर गेलेल्या कार्तिकला एकदिवसीय संघही खुणावत होता. रणजी करंडकाच्या २००१-०२ च्या हंगामात त्याने ३४ बळी मिळवले. अंतिम फेरीत बडोद्याविरुद्ध त्याने ८ बळी आणि ६९ धावा अशी कामगिरी करत रेल्वेला पहिला रणजी करंडक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतरच्या चॅलेंजर चषक आणि विभागीय एकदिवसीयमध्ये त्याने ७ सामन्यांत १० बळी मिळवत भारतीय एकदिवसीय संघात प्रवेशासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. संबंध हंगामात केलेल्या चांगल्या कामगिरीचे फळ लवकरच त्याला मिळाले. झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत कार्तिकने ८ षटकांत ४७ धावा दिल्या. यानंतर विंडीजविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यातही त्याने चांगली गोलंदाजी केली.
कुंबळे आणि हरभजनसारखे फिरकी गोलंदाज असताना कार्तिककडे कायमच तिसरा पर्याय म्हणून पाहिले गेले. या दोघांपैकी कोणी खेळू शकले नाही तरच त्याला संघात स्थान मिळाले. गांगुलीने त्याला पुरेशी संधी दिली नाही असेही काहीजण म्हणतात. द्रविडच्या नेतृत्वाखाली २००४ साली भारताने खेळलेल्या बॉर्डर-गावसकर चषकाच्या चौथ्या सामन्यात ७ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यात त्याने हातभार लावला. या सामन्यात तो सामनावीरही होता. यानंतरही तो भारतासाठी केवळ एक कसोटी सामना खेळला.
भारतीय संघातून आतबाहेर करणाऱ्या कार्तिकने २००४ साली काऊंटी क्रिकेटचा मार्ग धरला आणि रॅम्सबॉटम संघाकडून व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळू लागला. आपल्या पहिल्या हंगामात त्याने १९ सामन्यांत ८० बळी आणि ४६४ धावा अशी कामगिरी केली. पुढच्या वर्षी त्याने याच संघासाठी आपली कामगिरी उंचावत २० सामन्यांत ८३ बळी मिळवले आणि ५१९ धावादेखील काढल्या. या कामगिरीमुळे प्रसिद्ध काऊंटी क्लब लँकेशायरने त्याला बदली परदेशी खेळाडू म्हणून संधी दिली.
इसेक्सविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात त्याने १० बळी मिळवले आणि लँकेशायरकडून पदार्पणात अशी कामगिरी करणारा पहिला परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला. यात दोन्ही डावांत त्याने अँडी फ्लॉवरला बाद केले. कुठल्याही संघाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूला सामन्याआधी टोपी दिली जाते. लँकेशायरकडून पदार्पणाच्या या सामन्यात कार्तिकसाठीची टोपी तयार नसल्याने तो डॉमिनिक कॉर्कची टोपी घालून खेळला होता. काऊंटी कारकिर्दीमध्ये त्याने मिडलसेक्स, सॉमरसेट आणि सरे अशा विविध संघांचे प्रतिनिधित्व करत ६० सामन्यांत २२० बळी मिळवले. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात सरेकडून खेळताना एका सामन्यात सॉमरसेटच्या ऍलेक्स बॅरोला मंकेडिंगद्वारा बाद करत त्याने वाद ओढवून घेतला. पुढील वर्षी रणजी क्रिकेटमध्येदेखील बंगालच्या एका फलंदाजाला त्याने असेच बाद केल्याने त्याच्यावर बरीच टीका झाली होती.
काऊंटी क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करूनही कार्तिक भारतीय संघाचा नियमित सदस्य कधी बनू शकला नाही. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त न होता त्याने टीव्ही वाहिन्यांसाठी समालोचक आणि विश्लेषक म्हणून काम करणे सुरु केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००७ साली मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये समालोचक म्हणून काम केल्यानंतर चौथ्या सामन्यात त्याने एकदिवसीय संघात पुनरागमन केले. एकाच मालिकेत समालोचक आणि खेळाडू म्हणून भाग घेणारा कार्तिक हा एकमेव खेळाडू असावा. त्याच मालिकेच्या सातव्या एकदिवसीय सामन्यात त्याने १० षटकांत फक्त २७ धावा देत ६ बळी मिळवले.
त्यानंतर झहीर खानबरोबर ९ व्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तरीही तो संघातले स्थान कायम राखू शकला नाही. भारतीय संघात स्थान नसले तरी देशांतर्गत स्पर्धांमध्ये पुढची ७ वर्षे क्रिकेट खेळत २०१४ साली कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याअगोदर आयपीएलमध्ये कार्तिक कोलकता नाईटरायडर्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, किंग्ज इलेव्हन पंजाब अशा विविध संघाकडून खेळला. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात अनुपम मुखर्जी या ब्लॉगरने ‘फेक आयपीएल प्लेयर’ नावाने एक ब्लॉग सुरु केला. या काल्पनिक लिखाणाने क्रिकेटविश्वात खळबळ माजवली. हा फेक आयपीएल प्लेयर म्हणजे मुरली कार्तिकच असल्याचे अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. इतकंच काय त्याच्या बायकोलाही हा ब्लॉग तोच लिहितोय अशी खात्री पटली असे कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले.
भारताकडून खेळलेल्या ८ कसोटी सामन्यांत कार्तिकने २४ तर ३७ एकदिवसीय सामन्यांत ३७ बळी मिळवले. एकदिवसीय आणि कसोटीमधली आकडेवारी सुमार वाटणाऱ्या कार्तिकने २०३ प्रथम श्रेणी सामन्यांत ६४४ बळींबरोबरच ४४२३ धावाही केल्या आहेत. या ६४४ पैकी २२० बळी इंग्लंडमध्ये आहेत. त्याच्या या आकडेवारीवरून तो किती उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे हे लक्षात येते. क्रिकेटच्या मैदानावर कार्तिक गळ्याभोवती घट्ट बांधलेल्या नेकलेसमुळे, गॉगल घालून गोलंदाजी करायच्या शैलीने आणि त्याच्या आर्मबॉलमुळे लक्षात राहिला. सध्या तो विविध वाहिन्यांवर समालोचक म्हणून काम करतो. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने समालोचक म्हणून काम केले. भारताच्या सामन्यांमध्ये तो खेळपट्टीचा अहवाल सांगताना अधूनमधून दिसत असतो.
प्रचंड गुणवत्ता असूनही कर्णधाराचा विश्वास नाही म्हणून म्हणा, दोन उत्तम फिरकी गोलंदाजांच्या छायेत पर्यायी गोलंदाज म्हणून खेळावे लागले म्हणून म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध न करू शकल्याने म्हणा किंवा अजून काही, मुरली कार्तिक भारतीय क्रिकेटचा शापित शिलेदारच राहिला.
कार्तिकची क्रिकेट कारकिर्द
एकदिवसीय
सामने – ३७ बळी – ३७
कसोटी
सामने – ८ बळी – २४
प्रथम श्रेणी
सामने – २०३ बळी – ६४४
क्रिकेटवरील “मुंबई क्रिकेट सफरनामा ” लेखमालिकेतील काही खास लेख-
–मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
– मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट