ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ डिसेंबर) झाला. या सामन्यात भारताने ६ गड्यांनी विजय मिळवून टी२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून सलामीवीर शिखर धवनने तडाखेबंद अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. आपल्या या अर्धशतकी खेळी दरम्यान त्याने एक विशेष विक्रम आपल्या नावे केला.
भारताने सामन्यासह केला मालिकेवर कब्जा
पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ विजयाच्या उद्देशाने आज मैदानात उतरला. सिडनीच्या फलंदाजांसाठी मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. भारताकडून युवा टी नटराजनने दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, सलामीवीर केएल राहुल व सलामीवीर शिखर धवनने भारताला तुफानी सुरुवात दिली. भारताने पहिल्या सहा षटकात ६० धावांची लयलूट केली. शिखर धवनने अर्धशतक झळकावले. अखेरीस श्रेयस अय्यर व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी चौकार-षटकारांची बरसात करत, भारताला १९५ धावांचे लक्ष्य गाठून दिले. सामनावीराचा पुरस्कार हार्दिक पंड्याला देण्यात आला.
शिखर धवनने केली विशेष कामगिरी
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर शिखर धवनने ३६ चेंडूत ५२ धावांची लाजवाब खेळी केली. यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान शिखरने एक विशेष कामगिरीची नोंद केली. शिखर आता भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा डावखुरा फलंदाज बनला आहे. त्याच्या नावे आता १,६२४ धावा जमा झाल्या आहेत. यापूर्वी भारताकडून डावखुरा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा सुरेश रैनाच्या नावे होत्या. त्याने, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १,६०५ धावा काढल्या आहेत.
या दिग्गजांचा ही यादीत आहे समावेश
शिखर आणि रैनापाठोपाठ दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १,१७७ धावा बनवल्या आहेत. त्यानंतर, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा या यादीत क्रमांक लागतो. गंभीरने भारताकडून ९९२ टी२० धावा काढल्या होत्या. युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. रिषभच्या नावे ४१० धावा आहेत.
भारताकडून सर्वाधिक टी२० अर्धशतके काढणारा डावखुरा फलंदाज बनला शिखर
आजच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करताच शिखर धवन भारताकडून १० किंवा दहापेक्षा अधिक अर्धशतके बनवणारा पहिला डावखुरा फलंदाज ठरला. त्याच्यापाठोपाठ, गंभीरने ७ व रैनाने ५ अर्धशतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर