नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 : चेहऱ्यावर निरागसता दिसणाऱ्या २३ वर्षीय बंदरिका खारकोंगोर जेव्हा प्रो पंजा लीगच्या टेबलवर येते तेव्हा भल्याभल्या प्रतिस्पर्धींना ती चीतपट करून सोडते. पंजा टेबलवर तिच्या चेहऱ्याचे भाव बदलतात, एक भयंकर दृढनिश्चय तिच्या डोळ्यांमध्ये दिसतो जो तिच्या विरोधकांना अस्वस्थ करतो.
मेघालयातील शिलाँग येथील बंदरिका मुंबईस्थित फ्रँचायझी मुंबई मसलसाठी नवी दिल्लीतील IGI स्टेडियममध्ये आयोजित प्रो पंजा लीगच्या पहिल्या पर्वात खेळतेय.
ती तिच्या तीन बहिणी आणि आईसोबत राहते आणि तिने सेंट एडमंड कॉलेज, शिलाँगमधून बॅचलर ऑफ सोशल वर्कमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आता फॅशनमध्ये डिप्लोमा करत आहे. शिलाँगमध्ये ती अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात लढा देणारी एक सामाजिक कार्यकर्ती आहे.
लहानपणापासून बंदरिकाला खेळाची आवड होती, पण आपण आर्म रेसलर होऊ असे तिला कधीच वाटले नव्हते. ती सांगते, “माझ्या शाळेच्या दिवसात मी सर्व खेळ खेळायचे. पण, एकदा कॉलेजमध्ये आर्म रेसलिंग स्पर्धा सुरू झाली आणि मी त्यात भाग घेण्याचे ठरवले आणि तेव्हापासून मी मागे वळून पाहिले नाही.”
“मी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिंकली आणि नंतर आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांसाठी माझी निवड झाली. त्या वेळी जे रेफरी आमच्या कॉलेजला भेट देत असत, त्यांनी मला सांगितले की, जर मला आर्म रेसलिंग हा खेळ म्हणून निवडायचा असेल तर मी त्याचं गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे आणि कठोर परिश्रम केले पाहिजे, मग यश मिळू शकेल,” ती पुढे म्हणाली.
बंदरिकासाठी आर्म रेसलिंग हा केवळ एक खेळ नाही. “ मी जेव्हा कुठेही आर्म रेसलिंग स्पर्धा पाहते तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडायला लागते आणि मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. आर्म रेसलिंग माझ्या मनात नेहमीच असते आणि मी नेहमी माझ्या मित्रांना सांगते, चला स्पर्धा करूया. जेव्हा मी आर्म रेसलिंग करते तेव्हा मला जिवंत असल्यासारखं वाटते,”असे तिने सांगितले.
बंदरीकाने तिच्या यशाचे श्रेय आईला दिले. तिच्या संपूर्ण प्रवासात आईने तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. तिने सांगितले, “माझी आई माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक वेळी मी स्पर्धा करत असताना ती मला माझे सर्वोत्तम देण्यासाठी प्रोत्साहन देते. ती माझे सर्व सामने पाहते आणि तिने मला काहीही झाले तरी हार मानू नये असे शिकवले आहे आणि हेच मला पुढे चालत राहण्यासाठी प्रेरणादायी ठेवते.”
प्रो पंजा लीगने युवा खेळाडूंना कशी मदत केली आणि आर्म रेसलर खेळाला प्रसिद्धी मिळवून दिल्याचे २३ वर्षीय बंदरिका सांगते. ती म्हणाली, “प्रो पंजा लीग ही आर्म रेसलरसाठी व्यासपीठ आहे. या लीगद्वारे प्रत्येकाला त्यांचे कौशल्य आणि ते किती सक्षम आहेत, हे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. या अभूतपूर्व लीगचा पुढेही भाग व्हायचे असल्यास खेळाडूंना आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करते.”
ती पुढे म्हणाली, “मी या संधीचा लाभ घेऊन सर्वांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला कोणत्याही खेळात मोठी झेप घ्यायची असेल तर तुमच्यासमोर आव्हाने येतील, परंतु कधीही हार मानू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा.”
आगामी काळात ईशान्येकडील आणखी आर्म रेसलर या लीगमध्ये सहभागी होतील, असा विश्वास बंदरिकाला आहे. ती म्हणते, “या पहिल्या सीझनमध्ये पूर्वोत्तर प्रदेशातून त्रिदीप मेधी, चेतना शर्मा आणि रिबासुक लिंगडोह मावफ्लांग यांच्यासारख्या अनेक खेळाडू आहेत. याशिवाय, मेघालय राज्य ऑलिम्पिक असोसिएशनने आर्म रेसलिंगला एक खेळ म्हणून मान्यता दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मेघालय गेम्समध्ये हा खेळ असेल. मला खात्री आहे की आम्ही भविष्यात ईशान्येकडील आणखी आर्म रेसलर पाहणार आहोत.”
प्रो पंजा लीगमध्ये भाग घेतल्यानंतर, बंदरिका आगामी जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे, जी २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान अल्माटी, कझाकस्तान येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया