इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये गुरूवारी (२९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ७ गड्यांनी विजय मिळविला. यासह मुंबईने गुणतालिकेतील पहिल्या चार संघातील आपले स्थान कायम राखले. या सामन्यात राजस्थान रॉयल्स कर्णधार संजू सॅमसन व अष्टपैलू शिवम दुबे यांच्या दरम्यान एक अजब घटना घडली.
शिवम दुबेचा चढला पारा
राजस्थान रॉयल्सने पहिल्या डावात १७१ धावा काढून मुंबईसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉकने संघाचा डाव सावरला. तो एकट्याच्या जीवावर संघाला विजयाकडे घेऊन चाललेला.
पहिल्या १० षटकांमध्ये मुंबईने ८० पेक्षा जास्त धावा फटकावल्यामुळे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अकरावे षटक टाकण्याची जबाबदारी शिवम दुबेकडे दिली. या षटकातील दुसरा चेंडू शिवमने खोलवर टप्प्याचा टाकला. मात्र, तो फलंदाजी करत असलेल्या डी कॉकच्या पायाला लागून सीमापार गेला. शिवमच्यामते हा चेंडू सॅमसन अडवू शकला असता. तो चेंडू सीमापार गेल्याने दुबेने निराश दिसला आणि सॅमसनकडे चिडला. ते पाहून सॅमसननेही डोळे मोठे करत इशारा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबईचा तिसरा विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर (४१), कर्णधार संजू सॅमसन (४२), यशस्वी जयस्वाल (३२) व शिवम दुबे (३५) यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर १७१ धावा धावफलकावर लावल्या. मुंबईसाठी राहुल चाहरने २ बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. मुंबईचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अशी २ कारणे, ज्यामुळे रोहित शर्मा अन् विराट कोहलीची तुलना तर होणारचं
Covid-19: राजस्थान रॉयल्सनंतर आता ‘या’ आयपीएल संघाने दिला मदतीचा हात, केली १.५ कोटींची मदत
क्रिकेटच्या तीन प्रकारात शतक करणारा रोहित तीन भारतीयांपैकी एक