मुंबई । आयपीएल 2020 मध्ये भारताचा उदयोन्मुख स्टार खेळाडू शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीला खेळताना मागील 3 सामन्यात तो सातत्याने चांगला खेळ केला आहे. बुधवारी राजस्थानविरुद्ध त्याने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान, आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूल यांना विश्वास आहे की, ‘गिल येत्या 2-3 वर्षांत आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसू शकेल.’
शुबमन गिल होणार कर्णधार
कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर शुबमन गिल हा भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. आयपीएलमध्ये ज्याप्रकारे तो चांगली फलंदाजी करीत आहे, ही भारतासाठी निश्चितच चांगली चिन्हे आहेत. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूल यांच्या मते, गिलची विवेकबुद्धी लक्षात घेता येत्या काळात तो आयपीएलमध्ये एका संघाचे नेतृत्व करेल.
क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले, “या स्पर्धेत शुभमनने खेळलेली एक परिपूर्ण खेळी आहे. पहिल्या सामन्यात त्याने विशेष कामगिरी केली नाही, पण त्याने या खेळीने सर्वांना प्रभावित केले. 143 च्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने आपला नैसर्गिक खेळ केला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने समजदारी दाखविली आणि तो मोठी खेळी करून संघाला सामना जिंकून देऊ शकतो हे सिद्ध केले. खेळपट्टीवर मॉर्गनसारखा अनुभवी फलंदाज बरोबर असल्यामुळे त्याला खूप मदत होत आहे. सामन्यादरम्यान तो खूप शांतपणे फलंदाजी करीत होता.”
आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिला विजय मिळविला होता. शुबमन गिलच्या खेळीने हा सामना केकेआरने सहज जिंकला.
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्या या युवा फलंदाजाने गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 62 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर केकेआरच्या संघाने हैदराबादविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला.
यानंतर या फलंदाजाने राजस्थानविरुद्ध 47 धावांची खेळी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. या युवा फलंदाजाने 2019 च्या न्यूझीलंड दौर्यावर भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. मात्र गिलला हे पदार्पण गाजवता आले नाही. पण हा खेळाडू भारतीय संघाचे भविष्य आहे, याबद्दल मात्र कुणालाही शंका नाही.