---Advertisement---

भारताविरुद्ध भारतात सलग ४ डावात शतकं करणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड

On: गुरूवार, जुलै 2, 2020 3:50 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर एव्हर्टन विक्स यांचे बुधवारी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. 2019 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. विक्स यांनी क्लाइड वालकोट आणि फ्रँक वॉरेलसह 1950 च्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला वर्चस्व मिळवून दिले होते. त्या तिघांच्या तिकडीला वेस्ट इंडिजचे ‘द थ्री डब्ल्यू’ म्हणून ओळखले जायचे.

विक्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले असून यात त्यांनी 58.61 च्या सरासरीने 15 शतके आणि 19 अर्धशतकांसह 4455 धावा केल्या होत्या. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 152 सामन्यांत 55.34 च्या सरासरीने 12010 धावा केल्या होत्या. ते वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजांपैकी एक होते.

1948 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी इंग्लंड विरुद्ध ब्रिजटाऊन येथे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पदार्पणानंतर त्यांना पहिल्या 3 सामन्यात खास काही करता आले नाही.

परंतू चौथ्या सामन्यात त्यांनी इंग्लंड विरुद्ध 141 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढील सगल 4 डावातही त्यांनी शतके केली होती. ही 4 शतके त्यांनी भारताविरुद्ध भारतात केली होती. त्यांनी दिल्ली, मुंबई कसोटीत प्रत्येकी 1 आणि कोलकाता कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यामुळे ते सलग 5 कसोटी डावात शतके करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. हा विश्वविक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे.

विशेष म्हणजे चेन्नई कसोटीतही त्यांना शतकाची संधी होती, परंतु ते 90 धावांवर खेळत असताना त्यांना धावबाद दिले गेले. हा निर्णयही वादग्रस्त ठरला होता. जर त्यावेळी शतक झाले असते तर ते त्यांचे सलग 6 वे शतक ठरले असते.

त्यांनी कसोटीत 1000 धावा केवळ 12 डावात पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विश्वविक्रमही विक्स यांच्या नावावर आजही आहे.

विक्स केवळ क्रिकेटमध्येच नाही तर फुटबॉल खेळातही इतके पारंगत होते की ते बार्बाडॉसचे प्रतिनिधित्वही करु शकले असते. परंतु क्रिकेट त्यांचा आवडता खेळ होता. विक्स यांची कारकिर्द शानदार असली तरी त्यांना मांडीच्या दुखापतीचा खूप त्रास झाला, त्यामुळे त्यांना केवळ 48 सामने खेळल्यानंतर 33 व्या वर्षीच निवृत्ती घ्यावी लागली.

परंतु त्यांनी नंतर क्रिकेट क्षेत्रातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात निवृत्तीनंतर पाऊल टाकले. त्यांनी 1979 च्या विश्वचषकात खेळलेल्या कॅनडा संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले होते. 1994 नंतर त्यांनी आयसीसी सामनाधिकारी म्हणूनही काम पाहिले. 1995 मध्ये त्यांना सर ही मानाची पदवी देण्यात आली.

त्यांचा मुलगा डेव्हिड मरे देखील वेस्ट इंडिजसाठी खेळला, तोही वेस्ट इंडिजचा चांगला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ओळखला गेला.

ट्रेंडिंग घडामोडी –

टॉपलेस फोटो शेअर करणाऱ्या माजी महिला खेळाडूवर इंस्टाग्रामची कारवाई; म्हणते, स्वातंत्र्यावर…

आश्चर्यकारक! बीसीसीआय नाही तोडणार चीनी कंपन्यांशी संबंध; म्हणतात, कधीच…

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यपदाचा राजीनामा; आता हे दिग्गज होऊ शकतात अध्यक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---