इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सध्या भारतात सुरु आहे. पण हा हंगाम राजस्थान रॉयल्स संघासाठी धक्का देणारा हंगाम ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांचे तब्बल ४ परदेशी खेळाडू या हंगामातून बाहेर पडले आहेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे तर लियाम लिव्हिंगस्टोन बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने आणि अँड्र्यू टाय देखील कोरोनाचे कारण देत या हंगामातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना बदली खेळाडू शोधण्याचे आव्हान राजस्थान समोर आहे.
यादरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार असे समोर येत आहे की राजस्थानने बेन स्टोक्सचा बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी वॅन दर डसन या खेळाडूला संघात सामील केले आहे. तसेच तो सध्या बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे ७ दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे.
वॅन दर डसन आहे चांगल्या फॉर्ममध्ये
वॅन दर डसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी२० मालिकांमध्ये चांगली कामगिरी बजावली होती. वनडे मालिकेत त्याने १ शतक आणि १ अर्धशतक केले होते. तर टी२० मालिकेतही १ अर्धशतक केले होते.
टी२० कारकिर्दही आहे चांगली
रस्सी वॅन दर डसनची टी२० क्रिकेट कारकिर्दही चांगली आहे. त्याने आत्तापर्यंत १२६ टी२० सामने खेळले असून ३८.६२ च्या सरासरीने ३ शतके आणि २६ अर्धशतकांसह ३८२४ धावा केल्या आहेत. तरी त्याने अजूनपर्यंत आयपीएलमध्ये एकाही संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. त्यामुळे जर त्याला राजस्थान रॉयल्सकडून संधी मिळाली तर तो आयपीएलमध्ये पदार्पण करु शकतो.
गेलचा झेल घेताना झाली होती स्टोक्सला दुखापत
खरंतर बेन स्टोक्स यंदा संपूर्ण हंगामात खेळणार होता. मात्र, पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळताना त्याला ख्रिल गेलचा झेल घेण्याच्या प्रयत्नात हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचीही गरज पडल्याने तो मायदेशी परतला. तो आता जवळपास ३ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मनीष पांडेला कोणी केले होते संघाबाहेर? स्वतः संघ प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा
राजस्थानची ‘रॉयल’ मदत! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केले कोट्यवधी रुपयांचे दान
आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार






