भारतीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण? असा प्रश्न विचारला गेला तर अनेक उत्तरे मिळतील. कोणी म्हणेल एकनाथ सोलकर हे भारताचे सर्वात्तम क्षेत्ररक्षक होते. कोणी म्हणेल कपिल देव आणि मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या क्षेत्ररक्षणाला तोड नाही. ९० च्या दशकात जन्मलेले क्रिकेटचाहते युवराज सिंह, मोहम्मद कैफ किंवा सुरेश रैना यांची नावे घेतील. आताच्या नव्या पिढीतील खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि विराट कोहली सरस आहेत, असेही उत्तर दिले जाईल. मात्र, या सर्व खेळाडूंव्यतिरिक्त एक मुंबईकर क्रिकेटपटू होते, ज्यांना अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू ‘भारतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक’ मानतात, ते क्रिकेटपटू म्हणजे रामनाथ पारकर.
विनू मंकड यांच्याकडे गिरवले क्रिकेटचे धडे
पारकर यांचा जन्म मुंबईचा. वरळीतील जांबोरी मैदानावर त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे, एलआर तैरसी संघाकडून ते माजी भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या प्रशिक्षणाखाली खेळू लागले. पारकर यांना एक खेळाडू म्हणून घडवण्याचे काम मंकड यांनी केले. पारकर यांनी काही काळ क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ओळखले जाणाऱ्या रमाकांत आचरेकरांकडे देखील प्रशिक्षण घेतले. सन १९६४-१९६५ च्या हंगामात त्यांनी आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. सुलतान टोबॅको कोल्ट्स संघाकडून त्यांनी आपला पहिला सामना खेळला होता. याच काळात त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून नोकरीचा प्रस्ताव आला. नोकरी सांभाळून ते क्रिकेटचा देखील सराव करत.
अंतिम संघाआधी बारावा खेळाडू म्हणून झाली पारकर यांची निवड
पारकर यांची ६० चे दशक संपता संपता मुंबईच्या रणजी संघात निवड झाली. या निवडीची एक गंमत होती, ती म्हणजे अंतिम अकरा खेळाडूंआधी बाराव्या खेळाडूची निवड झाली आणि तो बारावा खेळाडू होते रामनाथ पारकर. पारकर यांच्या क्षेत्ररक्षणामुळे त्यांना ही संधी देण्यात आली होती. सन १९७०-१९७१ रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्याद्वारे त्यांनी रणजी पदार्पण केले. पारकर यांनी या हंगामाच्या उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध आणि अंतिम फेरीत महाराष्ट्राविरुद्ध शतकी खेळी करत, मुंबईला विजेतेपद पटकावून दिले. त्यानंतर, पारकर यांनी सलग दुसरा रणजी हंगाम देखील गाजवला. १९७१ या वर्षी त्यांना देशांतर्गत क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले.
अवघ्या दोन सामन्यांची राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पारकर यांची देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरी पाहून त्यांचा लवकरच भारतीय संघात समावेश करण्यात आला. सन १९७२ च्या अखेरीस, इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. मालिकेतील पहिल्या दिल्ली कसोटीत त्यांना पदार्पणाची संधी मिळाली. बरीच वर्षे त्यांच्यासमवेत मुंबईसाठी सलामीला येणारे सुनील गावसकर यावेळी देखील त्यांचे जोडीदार होते. पहिल्या डावात चार धावांवर बाद झाल्यानंतर, दुसऱ्या डावात त्यांनी ७२ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. कोलकत्ता येथील दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरल्याने त्यांना संघातून वगळण्यात आले. त्यानंतर पारकर कधीही भारतासाठी खेळले नाहीत.
१९७५ च्या विश्वचषक संघात नाही झाली निवड
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी व चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या, पारकर यांची १९७५ विश्वचषकात भारतीय संघात निवड होईल अशी सर्वांना आशा होती. निवडीच्या काही दिवस आधीच त्यांनी, हैदराबादविरुद्ध १९७ धावांची खेळी केली होती. तरीदेखील, त्यांची विश्वचषकासाठीच्या संघात निवड झाली नाही. १९७५-१९७६ रणजी हंगामानंतर त्यांची कामगिरी ढासळू लागली. तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ नोकरी करू लागले.
माजी क्रिकेटपटूंची रामनाथ पारकर यांच्याविषयीची मते
पारकर यांच्यासमवेत अनेक वर्ष सलामीवीर म्हणून खेळलेले सुनील गावसकर म्हणतात, “रामला त्याच्या ५’३” या कमी उंचीचा जास्त फायदा होत. कट, हुक आणि पूल तो आरामात मारत असे. माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी तो एक आहे.”
पारकर यांचे एकमेव राष्ट्रीय कर्णधार असलेले अजित वाडेकर म्हणाले होते सांगतात, “मी स्वतःला नशीबवान समजतो कि राम माझ्या संघात होता. तो एक टीममॅन होता. तो कधीही कोणत्या गोष्टीला नाही म्हटला नाही. क्षेत्ररक्षण तर त्याच्या इतके अफलातून कोणीच करू शकत नाही.”
रामनाथ पारकर यांचे एकेकाळचे सहकारी दिलीप वेंगसरकर त्यांचे कौतुक करताना म्हणतात,
“त्यांचे क्षेत्ररक्षण नेत्रदीपक असायचे. दहा पैकी सात वेळा ते थेट यष्ट्यांवर सरळ फेक करत. भागवत चंद्रशेखर यांना त्यांच्या इतके आत्मविश्वासाने कोणीही खेळताना मी पाहिले नाही. ते असामान्य होते.”
अपघातामुळे राहिले ४३ महिने कोमात
निवृत्तीनंतर पारकर हे एल्फ-वेंगसरकर अकादमीत प्रशिक्षण देऊ लागले. काही काळ त्यांनी टाटा केमिकल्स आणि दादर युनियनसाठी देखील प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. सन १९९५ मध्ये मुंबईत त्यांचा एक अपघात झाला. या अपघातामुळे ते तब्बल ४३ महिने कोमात राहिले. अखेरीस, ऑगस्ट १९९९ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनेक भारतीय दिग्गजांच्या मते, रामनाथ पारकर हे आक्रमक फलंदाज व धडाकेबाज क्षेत्ररक्षक असल्याने, ते मर्यादित षटकांचे क्रिकेट चांगले खेळू शकले असते. कदाचित, त्यांचा जन्म काहीसा चुकीच्या काळात झाला होता.
वाचनीय-
जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही तीन क्लीन बोल्ड!
सीके नायडूंनी 90 वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार