साल १९९० च्या उत्तरार्धात कोथरुड हे आजच्या सारखे विस्तारले नव्हते. पुण्याचे उपनगर म्हटले तरी चालेल. परमहंस नगरमधील जीप ग्राऊंड हे परिसरातील टेनिस-बॉल क्रिकेटप्रेमींचे केंद्र होते. त्या मैदानावर खेळणाऱ्या सर्वांमध्ये एक १४-१५ वर्षाचा मुलगा नेहमी खेळायला येत. खेळणाऱ्या सर्वांमध्ये तो लहान होता. त्याचे घर मैदानापासून थोड्याच अंतरावर, तो कायम मैदानावरच दिसत. किशोरवयात ‘टेनिस बॉल स्टार’ म्हणून परमहंस नगरमध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळविण्यास त्याने सुरुवात केली. आपल्या रेनबो क्रिकेट क्लबला दोन षटकांच्या सामन्यापासून २० षटकांच्या अनेक स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देण्यात तो मुलगा सिंहाचा वाटा उचलत. टेनिस बॉल क्रिकेटपटू ते भारतीय संघाचा अष्टपैलू असा प्रवास करणारा हा मराठमोळा पुणेकर खेळाडू म्हणजे ‘केदार जाधव’.
माढा ते कोथरूड
केदारचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी. त्याचे वडील महादेव हे राज्य वीज महामंडळात लिपिक म्हणून काम करत. त्यांचे दोन मोठे भाऊ हे आजही जाधववाडी येथे शेती करतात. महादेव यांनी नोकरीमुळे आपले बस्तान पुण्यातील कोथरुड येथे बसवले. केदारला क्रिकेटची आवड वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच लागली, असे त्याचे वडील सांगतात. केदारला तीन मोठ्या भगिनी आहेत. त्या अभ्यासात एकदम हुशार आणि केदार शिक्षणात रस नसलेला. एमआयटी स्कूल येथे तो शिकत असताना, त्या शाळेत क्रिकेटसाठी तितकेसे प्रोत्साहन नसल्याने त्याने पीवायसी हिंदू जिमखाना या पुण्यातील प्रसिद्ध क्लबमध्ये दाखला घेतला. तिथे तो तासनतास सराव करत.
दिलीप वेंगसरकर व सुरेंद्र भावे यांची पडली नजर
सन २००४ मध्ये केदारची निवड महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात झाली. त्याचवेळी बीसीसीआयने माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातून तरुण खेळाडूंना शोधण्यासाठी ‘टॅलेंट हंट’ कार्यक्रम सुरु केला होता. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी हा देखील त्याच कार्यक्रमाचे प्रॉडक्ट. केरळ विरुद्ध महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघातून खेळताना त्याने नेहरू स्टेडियमवर १९५ धावांची तुफानी खेळी केली. वेंगसरकर व महाराष्ट्राचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांची त्याच्यावर नजर पडली. त्या खेळी दरम्यान त्याने केलेली फटकेबाजी पाहून या दोघांनी त्याच्यावर विशेष मेहनत घ्यायला सुरुवात केली. टेनिस बॉलमुळे एकाच बाजूला फटके खेळण्याची त्याची वारंवारिता कमी झाली व तो परिपूर्ण फलंदाज बनू लागला.
खुन्नस असावी तर अशी
केदार हा टेनिस बॉल क्रिकेटपटू असल्याने त्याचा स्वभाव अत्यंत आक्रमक होता. एका स्थानिक सामन्यात एका वरिष्ठ वेगवान गोलंदाजाने त्याला डाव्या हाताने फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्याने ते आव्हान स्वीकारून, त्या गोलंदाजाविरुद्ध उर्वरित डावात डाव्या हाताने फलंदाजी केली. अन्य एका घटनेत देखील एका फिरकीपटूने त्याला प्रत्येक चेंडूवर स्वीप मारण्यास सांगितले व त्याने ते करून दाखवले.
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल
केदारने महाराष्ट्रासाठी आपले प्रथमश्रेणी पदार्पण २००७ रणजी हंगामात केले. मात्र, त्याला म्हणावी तशी आपली छाप सोडता आली नाही. २०१० आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स तर २०११ मध्ये तो कोची टस्कर्स केरला संघाचा भाग बनला. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती २०१२ रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ठोकलेल्या त्रिशतकामुळे. एकप्रकारे या त्रिशतकापासून त्याची क्रिकेट कारकीर्द नावारुपाला आली. २०१३-२०१४ रणजी हंगामात त्याने ६ शतकांसह तब्बल १,२२३ धावा ठोकल्या. महाराष्ट्र संघाने त्यावर्षी २१ वर्षानंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
…आणि त्याची स्वप्ने पूर्ण झाली
देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला २०१४ आयपीएल लिलावात भेटले. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर २ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्याचे लहानपणापासूनचे बीएमडब्ल्यू कार घेण्याचे स्वप्न तेव्हा पूर्ण झाले. त्याच वर्षी आयपीएलनंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश झाला. मात्र, त्याला तिथे एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेविरुद्ध रांची येथील पाचव्या वनडे सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. तेेव्हा तो वयाची तिशी पार करण्याच्या अगदी जवळ आला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबंग कामगिरी
केदारचा समावेश २०१५ मध्ये झिम्बाब्वे दौर्यावर गेलेल्या दुय्यम दर्जाच्या भारतीय संघात केला गेला. मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या ८७ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी त्याने केली. या शतकानंतर त्याने केलेला दबंग स्टाईल डान्स आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. केदार हळूहळू भारतीय संघात आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत होता. २०१७ मध्ये आपल्या घरच्या पुणे येथील मैदानावर इंग्लंडने दिलेल्या ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसोबत त्याने २०० धावांची भागीदारी केली. त्याने ७६ चेंडूत १२० धावांची आक्रमक खेळी केली. त्याच मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही ९० धावांची खेळी करत त्याने मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला. केदार आपल्या क्रिकेट कारकीर्दीचे श्रेेय महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचेे माजी अध्यक्ष अजय शिर्के यांना देतो. त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने, आपण इथपर्यंत आल्याची प्रांजळ कबुली त्याने दिली होती.
एक चांगला अष्टपैलू म्हणून केदार तीन वर्ष भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू बनून राहिला. २०१९ विश्वचषकानंतर तो राष्ट्रीय संघातून बाहेर गेला. मात्र, आयपीएलमध्ये त्याचे एखाद-दुसरी दमदार खेळी पाहायला मिळते. तीन हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळल्यानंतर त्याने २०२१ आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना दिसला. त्यानंतर मात्र, त्याची चर्चा फारशी झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केकेआरच्या ‘मॅच विनर’ वेंकटेशला WWE रेसलरकडून आयपीएलसाठी खास संदेश, पाहा काय म्हणाला?