श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी विरोधी संघातील खेळाडूंना सहज वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. जरी विरोधी संघ आपल्यावर दबाव टाकत असेल, तरीही उलट रसेल त्यांच्या कामगिरीने विरोधी संघाला दबावात आणत असत. क्रिकेटमधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर रसेल अर्नोल्ड खेळाचे तज्ञ विश्लेषक झाले. नुकतेच त्यांनी श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भाष्य केले आहे.
रविवारपासून (18 जुलै) भारत आणि श्रीलंका संघांमध्ये एकदिवसीय मालिका आणि टी20 मालिका सुरू होणार आहे. याच मालिकेचा भाग असलेल्या पृथ्वी शॉबद्दल रसेल अर्नोल्ड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत दोन्ही संघांदरम्यान विजय-पराभवाचे अंतर निर्माण करू शकतो, असे मत माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड यांनी व्यक्त केले आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रसेल अर्नोल्ड म्हणाले की, “भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरील संघात शिखर धवन आणि हार्दिक पांड्या हे दिग्गज खेळाडू आहेत. पण पृथ्वी शॉ हा एक वेगळाच व्यक्ती आहे, जो एकदिवसीय आणि टी20 मालिकेत सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. त्याची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी पाहण्यासारखी असेल. आशा आहे की, तो उत्कृष्ट प्रदर्शन करून प्रत्येकाचे मनोरंजन करेल आणि मला योग्य सिद्ध करुन दाखवेल.”
भारतीय संघाचा हेवा वाटतो
तसेच रसेल अर्नोल्ड यांनी असे स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताकडे असे काही खेळाडू आहेत ज्यांच्याबद्दल त्यांना हेवा वाटतो. कारण त्यांच्यात सर्व स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे.
याविषयी बोलताना अर्नोल्ड म्हणाले की, “भारतीय संघाकडे असे क्रिकेटपटू असल्याचा मला हेवा वाटतो. त्यांच्यातील गुणवत्ता, त्यांची अविश्वसनीय कामगिरी आम्ही पाहिली आहे. विशेष म्हणजे, श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. कारण काही नव्या शिलेदारांबरोबर शिखर धवन, हार्दिक पांड्या त्याचबरोबर फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हेसुद्धा संघात आहेत. त्यामुळे ही मालिका पाहण्यासारखी असणार आहे.”
सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरणार पृथ्वी आणि धवन
पहिला एकदिवसीय सामना रविवारी कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातून पृथ्वी शॉ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिसेल. पृथ्वी शॉने वेस्ट इंडीजविरुद्ध शतक झळकावत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु पुढे कामगिरीतील चढ-उतारांमुळे तो संघातून आत- बाहेर होत राहिला.
डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत खराब प्रदर्शन केल्याने त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने मुंबईकडून खेळताना 827 धावा केल्या होत्या. त्यानंतर आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातही त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात जागा मिळाली आहे. तो श्रीलंकाविरुद्ध कर्णधार शिखर धवनसह सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
प्यार का कोई धर्म नही होता! दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करणारे ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर
आयपीएलपुर्वी ४० वर्षीय धोनीने कमी केले वजन, पाहा ‘स्लिम अन् फिट’ थालाचे फोटो