टी२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान सारख्या बलाढ्य आणि लयीत असलेल्या संघाचा घाम काढत ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने भरपूर वाहवाह लुटली. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर या ३३ वर्षीय फलंदाजाने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या १७ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ४१ धावा फटकावल्या. यादरम्यान षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. याच मॅथ्यू वेडबद्दलच्या एका रोमांचक तथ्यबद्दल आपण वाचणार आहोत.
पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत असताना जर तुम्ही मॅथ्यू वेडला निरखून पाहिले असेल; तर तुम्हाला त्याच्या एका हातावर मोठा टॅट्यू कोरलेला दिसेल. या टॅट्यूमध्ये सुरेख नक्षीकामासह एका व्यक्तीचा चेहरा कोरलेलो दिसतो. तर मग कोण आहे ही व्यक्ती? मॅथ्यू वेडने कशामुळे त्याच्या हातावर त्या व्यक्तीचा टॅट्यू केला असावा?
तर हा टॅट्यू आहे मॅथ्यू वेडच्या जिवाभावाच्या मित्राचा अर्थातच फिलिप ह्यूजेस याचा. होय, ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस, ज्याचा एका क्रिकेटसामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने अकनाक मृत्यू झाला. आपल्यापासून कायमचा दूर गेलेल्या या मित्राच्या आठवणीत सतत स्वत:ला रमवून टाकण्यासाठी त्याने आपल्या हातावर त्याचा टॅट्यू बनवून घेतला आहे.
वेड आणि ह्यूजेस १९ वर्षांचे असताना त्यांची मैत्री झाली होती. २०१३ च्या ऍशेस सीरिजमध्ये ते ऑस्ट्रेलियन कसोटी संघात परतण्यासाठी प्रयत्नशील होते. कारकिर्दीत एकाच टप्प्यातून जात असलेल्या या सवंगड्यांची तिथूनच गट्टी जुळली आणि पुढे ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. परंतु त्यांची ही मैत्री जास्त काळ टिकू शकली नाही.
२०१४ साली शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना ह्यूजेससोबत दुर्घटना घटली. सिडनी येथे दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून न्यू साउथ वेल्सविरुद्ध सामना खेळत असताना त्याला डोक्याला गंभीर जखम झाली होती. या सामन्यादरम्यान फलंदाजी करताना त्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते, पण चेंडू त्याच्या डाव्या कानाच्या अगदी खाली असलेल्या असुरक्षित भागावर आदळला होता. यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव सुरू झाला आणि याचमुळे २ दिवसांनंतर रुग्णालयात उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या ह्यूजेसच्या आठवणीत वेडने त्याचा टॅट्यू आपल्या हातावर काढून घेतला आहे. याबद्दल एकदा ‘डेली टेलीग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत वेडने खुलासा केला होता की, “संघाला अजूनही त्याची उणीव जाणवते. आताही ऑस्ट्रेलिया संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याचा वारसा नक्कीच जिवंत आहे.”
पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक उपांत्य सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळलेली खेळी पाहून ह्यूजेसला नक्कीच वेडचा अभिमान वाटत असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, ‘मी अजिबात खुश नाही…’
‘टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत माझा आणि विराटचा सहभाग नव्हताच’, शास्त्रींचा धक्कादायक खुलासा