ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू सायमन कॅटिचचा आज ४७ वा वाढदिवस. कॅटिचने आपल्या भात्यात असलेल्या प्रत्येक फटक्याने क्रिकेट चाहत्यांना कायम मंत्रमुग्ध केले. मॅथ्यू हेडन किंवा जस्टीन लँगर यांच्यासह सलामीवीराच्या जागेवर जोरदार प्रदर्शन करत, ऑस्ट्रेलियन संघाला जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर नेण्यात मोलाचे योगदान त्याने दिले. मात्र, ऐन भरात असताना, क्रिकेटमधील राजकारणाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावे लागले होते.
कॅटिचला २१ वर्षांचा असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली. १९९६-९७ च्या हंगामात पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून शेफील्ड शिल्ड स्पर्धेत त्याने १०३९ प्रथमश्रेणी धावा काढत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय सार्थकी लावला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत तो राष्ट्रीय संघाकडे वाटचाल करत होता. अशातच त्याला कांजिण्या झाल्या. कांजिण्यातून बरा होतोय की नाही, तोपर्यंत अनेक छोटे मोठे आजार त्याला होत राहिले. आजारपणामुळे कदाचित कॅटिचला आपले राष्ट्रीय पदार्पण लवकर करता आले नाही. २०००-०१ च्या घरगुती मोसमात या खडूस फलंदाजाने १२२२ धावा फटकावल्या आणि निवड समितीला २००१ च्या अॅशेस मालिकेसाठी त्याची निवड करण्यास भाग पाडले.
क्रिकेटच्या पारंपारिक फलंदाजांच्या पठडीत न बसणाऱ्या कॅटिचने गोलंदाजी देखील कमाल केली होती. २००३ मध्ये आपली अवघी दुसरी कसोटी खेळताना, आपल्या फिरकीने त्याने झिम्बाब्वे विरुद्ध ६५ धावात ६ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाला सहजरित्या विजयी केले होते.
कॅटिचचा संघ सहकारी असलेला डेमियन फ्लेमिंग याने त्याला ” डाव्या हाताचा लक्ष्मण ” अशी उपाधी दिली होती. त्याचे म्हणणे होते, कॅटिच हा लक्ष्मणप्रमाणे लेग साईडला अधिक धावा काढतो. २००३-२०१० या काळात तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य होता.
२००८ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिडनी कसोटी विजयानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ उत्साहात आनंद साजरा करत होता. संघाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कला वाटत होते की, राष्ट्रगीत लवकर गायले जावे, त्यामुळे खेळाडू लवकर निघू शकतील. परंतु, माइक हसी आणि कॅटिच यांनी त्याला वाट पाहण्याचा सल्ला दिला. क्लार्कने त्यांना उद्देशून काही अपशब्द वापरले आणि यामुळे कॅटिच आणखी भडकला. त्याने रागाच्या भरात क्लार्कची कॉलर पकडली. झाल्या प्रकारामुळे, क्लार्क ड्रेसिंग रूमच्या बाहेर पडला. हा वाद मिडियात बरेच दिवस गाजत होता.
दोन वर्षानंतर, मायकेल क्लार्कला २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २०११ च्या मध्यात जखमी कॅटिचला युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी म्हणून संघातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, त्याने पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. सायमन कॅटिच नेहमीच त्याला संघातून काढण्यासाठी क्लार्कला जबाबदार धरतो. मात्र, मायकल क्लार्क, ” हा निवड समितीचा निर्णय होता.” असे सांगतो. काही वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळून, मात्र त्याने २०१४ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
सायमन कॅटिचने २००१ मध्ये पदार्पण केले आणि पुढील एक दशक ऑस्ट्रेलियाच्या संघात सातत्याने तो खेळत राहिला. या कालावधीत त्याने आपल्या संघाबरोबर अनेक जय-पराजयांची चव चाखली. त्याने खेळलेल्या ५६ कसोटी सामन्यांत ४५ च्या प्रभावी सरासरीने १० शतके आणि २५ अर्धशतकांसह ४१८८ कसोटी धावा केल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात आक्रमक असे फलंदाज असल्याने कॅटिचला तितकीशी संधी मिळाली नाही. ४५ एकदिवसीय सामन्यात त्याने ३६ च्या सरासरीने १ शतक आणि ९ अर्धशतकांसह १३२४ धावा केल्या.
निवृत्तीनंतर त्याने, सेलिब्रिटी मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्याने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. आपल्या आईकडून पाककलेचे धडे घेतलेला कॅटीच क्रिस्पी सॅल्मन हा पदार्थ उत्तमरित्या बनवतो.
२०१५ मध्ये, ग्रेटर वेस्टर्न सिडनी या एएफएल क्लबने त्याची संचालक म्हणून निवड केली. आपल्या व्यवस्थापकीय कौशल्यने त्याने ग्रेटर वेस्टर्न सिडनी संघाला एका वर्षात पुढील स्पर्धेत स्थान मिळवून दिले.
क्रिकेटमध्ये असे फारच क्वचित घडते जेव्हा, निवडकर्ते पूर्वी घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतात. कॅटिचच्या बाबतीत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये कबूल केले की, ” कॅटिचला संघाबाहेर ठेवणे ही मोठी चूक होती. चार वर्षांपूर्वी जेव्हा कॅटिचला संघातून बाहेर काढले गेले होते तेव्हा तो जवळपास ५० च्या सरासरीने धावा काढत होता. ”
सध्या कॅटीचची गणती जगातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकांत होते. २०१५ पासून तो आयपीएलमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. २०२० आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मार्गदर्शन करताना दिसला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहलीच्या नेतृत्वामुळेच भारत सध्या कसोटी क्रिकेटमध्ये…’, माजी दिग्गजाने केला दावा
कसोटी चॅम्पियनशीपची फायनल ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिकाच खेळणार! माजी दिग्गजाची भविष्यवाणी
दीपक चाहरला संघाबाहेर ठेवल्याने चाहते संतापले! म्हणाले; ‘देख रहा है दीपक, कैसे…’