इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघाने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. नंतर याच्या उत्तरादाखल जो रूटच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने ३९१ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मोठ्या धावा करण्यात असमर्थ राहिले. यावर चाहत्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. गेल्या काही काळापासून रहाणे आणि पुजारा खराब फॉर्ममध्ये आहेत. यावर्षीची या दोघांची सरासरी २० च्या ही आत आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंना आता संघातून वगळण्याची मागणी केली जात आहे. भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर चांगलेच भडकले.
दरम्यान, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क सोबत बोलताना गावसकर म्हणाले, “जागतिक कसोटी अजिंक्य पदाच्या अंतिम सामन्यात रहाणेने सर्वोच्च धावा केल्या होत्या. खरेतर रहाणेला सोडून या काळात कोणताही फलंदाज धावा करण्यात यशस्वी ठरला नाही. त्यामुळे केवळ या दोन फलंदाजांच्या फॉर्म विषयी का बोलले जात आहे? कारण हे दोन्ही क्रिकेटर प्रसिद्ध नाही म्हणून? त्यांना संघातून बाहेर जरी काढले तरी ते शर्ट फाडून कोणता तमाशा करणार नाहीत.”
गावसकर यांच्या मते, संघातील अनुभवी फलंदाज सामन्यांमध्ये नेहमीच्याच प्रकारे बाद होत असतील, तर खेळाडू ऐवजी आपण सपोर्ट स्टाफला प्रश्न केला पाहिजे.
याबाबत पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “रहाणेला तुम्ही फक्त खेळू द्यावे, हा पण यामध्ये जर तो धावा करण्यात अयशस्वी राहिला, तर ही अडचणीची बाब असू शकते. परंतु, ही अडचण रहाणे आणि पुजारा यांच्या खेळण्याच्या तंत्रा (टेकनिक) विषयी असली पाहिजे. जर ते नेहमी एक सारख्या स्वरूपातच बाद होत असतील. तर यामागचे कारण काय असू शकते? हे कोण पाहते? यात केवळ पुजारा किंवा रहाणे जबाबदार नसून, तो पूर्ण स्टाफ जबाबदार आहे. कारण तुमच्या खेळण्याच्या समस्यावर मदत करणे हे स्टाफचे काम असले पाहिजे. हे जर होत नसेल तर खेळाडूंसोबतच यात सर्व स्टाफ देखील जबाबदार आहेत.”
दुसऱ्या डावात पुजारा-रहाणेने भारताला सावरले
भारतीय संघ लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात अडचणीत सापडला होता. पण पुजारा आणि रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली आणि भारताला सावरले. पण चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोघेही बाद झाले. पुजारा ४५ धावा करुन, तर रहाणे ६१ धावा करुन बाद झाला. दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–‘इंग्लंडचे गोलंदाजच भारताच्या विजयाला ठरू शकतात कारणीभूत’, पाहा असं का म्हणाला ब्रॉड
–आनंद गगनात मावेना! अप्रतिम चेंडू टाकत विराटची विकेट घेताच सॅम करनचे जोरदार सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल
–पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलचा मार्क वूडने ‘असा’ काढला काटा, पाहा व्हिडिओ