राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२२मधील ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ५ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या पुढील हंगामातील उपलब्धतेबद्दल चाहत्यांना खुशखबरी दिली. भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि आयपीएल समालोचक सुनील गावसकर यांनी धोनीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि मोठे वक्तव्यही केले आहे.
राजस्थानविरुद्धच्या (RR vs CSK) सामन्यावेळी नाणेफेकीसाठी गेला असताना धोनीने (MS Dhoni) आपण पुढील आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याबद्दल प्रतिक्रिया (MS Dhoni IPL Retirement) दिली होती. “नक्कीच, यामागे एक साधेसोपे कारण आहे. जर मी चेन्नईत न खेळताच आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर हा चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीवर एकप्रकारे अन्यायच असेल,”
“आशा आहे की, ही एक संधी असेल जिथे संघ प्रवास करतील आणि म्हणून मी सर्व ठिकाणांना धन्यवाद म्हणू शकेल. हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल की नसेल, हा खूप मोठा प्रश्न असेल. कारण आपण वास्तवात २ वर्षांबाबतची भविष्यवाणी नाही करू शकत. परंतु निश्चितपणे मी पुढील वर्षी आयपीएलमधून मजबूत पुनरागमन करण्यासाठी भरपूर मेहनत घेईल,” असेही धोनीने म्हटले होते.
सुनिल गावसकर काय म्हणाले?
धोनीच्या या वक्तव्याबद्दल बोलताना गावसकरांनी म्हटले की, पुढील वर्षी, आयपीएल २०२३ मध्ये धोनीला त्याच्या चाहत्यांना अलविदा करण्याची चांगली संधी असेल. १० फ्रँचायझी असल्यामुळे पुढील वर्षी आयपीएलमध्ये १० ठिकाणी सामने खेळवले जातील. अशात धोनीला प्रत्येक ठिकाणाच्या चाहत्यांना धन्यवाद करता येईल.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले की, “मला वाटते की, ही एक अद्भुत गोष्ट असेल. जसे की धोनीने सांगितले, त्याला सर्वांना धन्यवाद म्हणायचे आहे, ज्यांनी त्याच्या संघाचे समर्थन केले. तसेच त्याला फक्त एकट्या चेन्नई संघाच्या चाहत्यांना धन्यवाद म्हणायचे नाही, तर भारतीय संघाच्या चाहत्यांनाही धन्यवाद म्हणायचा असेल. कारण तो भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार राहिला असून त्याने संघाला विलक्षण असे यश मिळवून दिले आहे.”
“पुढील वर्षी अपेक्षा आहे की, आयपीएलचे सामने १० वेगवेगळ्या ठिकाणी होतील. जेणेकरून धोनी १० वेगवेगळ्या ठिकाणांच्या चाहत्यांना अलविदा म्हणू शकेल. अगदी धोनीचे घरचे मैदान रांची येथेही सामने होऊ शकतात. काही फ्रँचायझी आपल्या घरच्या मैदानाच्या रुपात अजून एखादे मैदान निवडतात. अशाच रांची हे चेन्नईचे घरचे मैदान बनू शकते. या गोष्टी घडू शकतात, याचा अर्थ त्याला संपूर्ण भारताचे आभार मानण्याची संधी मिळू शकते,” असेही गावसकरांनी म्हटले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला