जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवतोय. भारतीय संघाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची प्रदीर्घ कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात यावेत, अशी अनेक समीक्षकांनी व चाहत्यांनी मागणी केलेली दिसून येते. आता भारताचे दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर यांनी या मालिकेसाठी भारताचे दोन सलामीवीर कोण असावे याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे असावेत भारताचे सलामीवीर
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाची आदर्श कसोटी प्लेइंग इलेव्हन कशी असावी याबाबत आपले मत व्यक्त केले.
भारताच्या सलामीवीरांविषयी बोलताना ते म्हणाले, “रोहित शर्मा आगामी मालिकेसाठी नियमित सलामीवीर बनू शकतो. मात्र, युवा शुबमन गिलच्या स्थानावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गिलकडे पदलालित्याची कमतरता असून तो केवळ पुढे जातो. मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी त्याच्या खेळामुळे प्रभावित झालो होतो. त्याच्यात अफाट क्षमता आहे, मात्र त्याला आणखी मेहनत करावी लागेल.”
हा असेल गिलचा पर्याय
सुनील गावसकर यांनी शुबमन गिलचा पर्याय म्हणून मयंक अगरवालचे नाव सुचवले. ते म्हणाले, “मयंक अगरवालने सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या नावे दोन द्विशतके आहेत. तो या दौऱ्यावर संधी मिळाल्यास नक्कीच चांगली कामगिरी करेल.” मयंक अगरवाल सध्या भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर असला तरी, त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठीच्या अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते.
अशी आहे मयंकची कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मयंक अगरवालने भारतीय संघासाठी आत्तापर्यंत १४ कसोटी सामने खेळताना ४५.७० च्या सरासरीने १०५२ धावा बनविल्या आहेत. मात्र, मागील काही काळापासून तो सातत्याने अपयशी ठरत आहे. बांगलादेशविरुद्ध २०१९ मध्ये अखेरचे शतक झळकावल्यानंतर त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांमध्ये तो पूर्णतः अपयशी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीला घवघवीत यश, एकाच दिवशी जिंकले ३ सुवर्णपदकं
श्रीलंका दौर्यासाठी कर्णधार-प्रशिक्षकांची जोडी तय्यार! चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी