क्रिकेटविश्वातील महान फलंदाजांची नावे घेतली की भारतातून एक नाव नक्की पुढे येते, ते म्हणजे ‘लिटल मास्टर’ सुनिल गावसकर यांचे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावांचा टप्पा पार करणारे गावसकर आजही चर्चेत असतात. १९८७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या गावसकरांनी निवृत्तीनंतर समालोचनाचा मार्ग निवडला. परंतु दमदार क्रिकेट कारकिर्द आणि क्रिकेटची उत्तम जाण असूनही त्यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्ग का नाही निवडला? हा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. आता स्वत: गावसकरांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
‘द एनालिस्ट’ यूट्यूब चॅनलवर बोलताना गावसकर म्हणाले की, “मी क्रिकेट पाहणारा एक भयानक व्यक्ती राहिलो आहे. मी क्रिकेट खेळत असतानाही प्रचंड क्रिकेट सामने पाहात असायचो. जर मी बाद झालो, तर पव्हेलियनला परतल्यानंतर थांबत-थांबत सामना बघत असायचो. मी काही वेळ सामना पाहायचो आणि मग ड्रेसिंग रुममध्ये जाऊन काही-ना-काही वाचायचो किंवा मला आलेल्या पत्रांची उत्तरे लिहित बसायचो. त्यानंतर पुन्हा जाऊन सामना पाहात असायचो.”
“थोडक्यात सांगायचे झाल्यास मी गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे काका माधव मंत्री यांच्यासारखा प्रत्येक चेंडू-नी-चेंडू पाहणारा व्यक्ती नाही. जर एखादा क्रिकेटपटू प्रशिक्षक किंवा संघ निवडकर्ता बनला तर त्याला सामन्यातील प्रत्येक चेंडू पाहावा लागतो. याच कारणामुळे मी कधी प्रशिक्षक बनण्याचा विचार केला नाही,” असे ते पुढे म्हणाले.
माजी भारतीय कर्णधार गावसकर पुढे म्हणाले की, “माझ्याकडे बरेचसे लोक येत असायचे. सध्याचे जास्त नाही, पण सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि व्हिव्हिएस लक्ष्मण माझ्याकडे येत असत. मला त्यांच्यासोबत माझे नोट्स शेअर करण्यात खूप आनंद मिळत असे. कदाचित यातून त्यांना थोडीफार मदत मिळत असावी. परंतु मी हेच काम पुर्णवेळ करु शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs NZ : न्यूझीलंडच्या अथक प्रयत्नांनंतरही इंग्लंडला पहिला कसोटी अनिर्णित राखण्यात यश
द ग्रेट लारा! वेस्ट इंडीज दिग्गजाच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीला २७ वर्ष पूर्ण