टी-२० विश्वचषक २०२६च्या पहिल्या सामन्याला आता काही तासच शिल्लक असताना सहभागी संघांची चिंता वाढताना दिसत आहे. दुखापतींचा फटका अनेक संघांना बसत असून, या यादीत आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या रिप्लेसमेंटबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
टी-२० विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियन संघाला हा मोठा धक्का बसला आहे. हेजलवूडच्या दुखापतीबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती, मात्र अखेर त्याच्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. जरी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असला, तरी ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना काही दिवसांनी असल्यामुळे संघाकडे रिप्लेसमेंटसाठी थोडा वेळ उपलब्ध आहे.
हेजलवूडच्या बाहेर पडण्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणावर मोठा परिणाम झाला आहे. याआधीच कसोटी कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सही दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. सलग दोन प्रमुख वेगवान गोलंदाज अनुपलब्ध झाल्याने ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. हेजलवूड बऱ्याच काळापासून दुखापतीशी झुंज देत होता. तो सुपर ८ सामन्यांपूर्वी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सध्याची प्रकृती पाहता तो पुढील सामन्यांसाठीही उपलब्ध होऊ शकणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सध्या तात्काळ कोणताही रिप्लेसमेंट जाहीर केलेला नाही. संघ व्यवस्थापनाच्या मते, सुरुवातीचे काही सामने हेजलवूडच्या रिप्लेसमेंटशिवाय खेळता येऊ शकतात. मात्र गरज भासल्यास नंतर नव्या खेळाडूचा समावेश करण्यात येईल.
दरम्यान, जोश हेजलवूडच्या जागी सीन एबॉटला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीन एबॉट सध्या संघासोबत राखीव खेळाडू म्हणून उपस्थित आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यानही तो संघासोबत होता. मात्र अंतिम संघात त्याला स्थान मिळाले नव्हते. आता संधी मिळाल्यास त्याला मुख्य संघात स्थान दिले जाऊ शकते.






