आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आता शेवटाला पोहोचली आहे. चार आठवड्यांच्या थरारानंतर चार संघ बाकी राहिले आहेत. यामध्ये ४ आणि ५ मार्चला उपांत्य फेरीचे सामने खेळले जाणार आहेत. या महत्वाच्या सामन्यांसाठी आयसीसीने काही खास नियमावली बनवली आहे. ज्यामुळे दोन्ही सामन्यांचा निकाल लागेल.
या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना ४ मार्चला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. ईडन गार्डन्सवर हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. तसेच दुसरा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये इंग्लंड आणि भारत यांचा सामना होणार आहे.
या महत्वाच्या सामन्यांसाठी आयसीसीने रिजर्व-डे (राखीव दिवस) आणि एक्स्ट्रा -टाईम (अतिरिक्त वेळ) हे पर्याय ठेवले आहेत. आयसीसीने हवामानाचा अंदाज घेता काही नियम केले आहेत. सामने ठरवलेल्या दिवशी आणि वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच वेळ आली तर षटकेही कमी केली जाऊ शकतात. मात्र आयसीसीने सामना पूर्ण खेळण्यासाठी एक्स्ट्रा -टाईम दिला आहे. ज्यामुळे रिजर्व-डेचा वापर टाळता येईल. ठरवलेल्या दिवशी ९० मिनिटे आणि रिजर्व-डेच्या दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. निकालासाठी दोन्ही संघाना कमीत कमी १० षटके खेळणे बंधनकारक आहे.
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत, मात्र रिजर्व-डे साठी त्यात बदल करण्यात आला आहे. त्या दिवशी हे सामने दुपारी ३ वाजता खेळले जातील.
रिजर्व -डे च्या दोन स्थिती असणार आहेत. सामना रिजर्व -डेच्या स्थितीत गेला तर सामना आधीच्या दिवशीच्या खेळापासूनच सुरू होईल. तसेच सामन्याच्या दिवशी षटके कमी केली असतील तर ते रिजर्व-डेला ही लागू होईल. सामना ठरलेल्या दिवशी खेळलाच गेला नाही, तर रिजर्व-डेला २०-२० षटकांचा सामना खेळला जाणार. या स्थितीतही सामन्याचा निकाल लागला नाही तर ग्रुपमधील गुणतालिकेवरून कोणता संघ पुढे जाईल, हे ठरवले जाईल.
या स्पर्धेचा शेवटचा सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.






