---Advertisement---

भारताविरुद्ध बहिष्कार महागात! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानच्या निर्णयाचा टीम इंडियाला मोठा फायदा

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 5:41 AM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास आता फारसा वेळ उरलेला नाही. 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र स्पर्धेच्या अगदी तोंडावर पाकिस्तानने नवा वाद निर्माण केला आहे. 1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली असली, तरी 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्यासाठी किती महाग ठरणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल, पण याचा थेट फायदा मात्र टीम इंडियाला होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या ग्रुप-ए मध्ये आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ असून त्यातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यास, त्या सामन्याचे दोन गुण भारताला थेट मिळतील. त्यामुळे भारताचा सुपर-8 मध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक सोपा होईल.
ICC च्या प्लेइंग कंडिशननुसार, सामना न खेळल्यास पाकिस्तानचा नेट रनरेटही बिघडेल. नियम 16.10.7 नुसार, पाकिस्तानचे 20 षटकांत 0 धावा गृहित धरल्या जातील, तर भारताचे एकही षटक मोजले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानचा रनरेट मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. ग्रुप-ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ आहेत.

पाकिस्तानने भारताविरुद्ध बहिष्कार टाकला, तरी त्यांना उर्वरित सामने खेळावेच लागतील. पाकिस्तान 7 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्ड कपमधील आपली मोहीम सुरू करेल. त्यानंतर 10 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध आणि 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध त्यांचे सामने असतील. हे सर्व सामने कोलंबो येथील एसएससी मैदानावर खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तानच्या या निर्णयानंतर ICC कडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात. PCB वर दंड ठोठावण्यासोबतच, भविष्यातील द्विपक्षीय मालिकांवरही बंदी येऊ शकते. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) परदेशी खेळाडूंना NOC न देण्याचा निर्णयही होऊ शकतो. याशिवाय पाकिस्तानला आगामी आशिया कपमधूनही वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली असून, याचा सर्वाधिक फायदा भारतालाच होण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---