आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 आधी भारतीय महिला क्रिकेट संघ एका अत्यंत महत्त्वाच्या आणि कठीण कसोटीतून जाणार आहे. या कसोटीचा भाग म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा दौरा, ज्याची अधिकृत घोषणा क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार असून, ही मालिका वर्ल्ड कपपूर्व अंतिम तयारीच्या दृष्टीने फारच महत्त्वाची मानली जात आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने मंगळवार, 20 जानेवारी रोजी या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार भारतीय महिला संघ एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणार असून, पाच सामन्यांची टी-20 मालिका 17 एप्रिलपासून सुरू होऊन 27 एप्रिलला संपणार आहे. ही मालिका भारतासाठी टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची दुसरी शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असेल.
या पाच सामन्यांच्या मालिकेतील सामने डर्बन, जोहन्सबर्ग आणि बेनोनी या तीन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना 17 आणि 19 एप्रिल रोजी डर्बनमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना 22 आणि 25 एप्रिल रोजी जोहन्सबर्गमध्ये होणार आहे. तर 27 एप्रिल रोजी बेनोनी येथे पाचवा आणि अंतिम सामना खेळवण्यात येईल.
या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय महिला संघाला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंड दौऱ्यावरही तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्येच 12 जूनपासून आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 सुरू होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या यजमान संघाविरुद्ध खेळली जाणारी ही मालिका भारतीय संघासाठी अंतिम तयारीची मोठी संधी ठरणार आहे.
मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमधील ही मालिका पूर्ण होणार असून, त्यानंतर टीम इंडिया थेट वर्ल्ड कपच्या मैदानात उतरेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौरे भारतीय महिला संघासाठी वर्ल्ड कपपूर्व निर्णायक ठरणार आहेत.






