सध्या तालिबानचे अफगाणिस्थानवरील अधिकारामुळे देशाची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. अशात तिथल्या क्रिकेटवर आणि खेळाडूंसाठी चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानचा संघ क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. त्यामुळे तेथील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये देखील खेळत आहेत.
अशात आता अफगाणिस्तानमधून एक बातमी समोर आली आहे. तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी (२१ ऑगस्ट) अफगाणिस्तानचा राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमातुल्लाह शाहीदीसोबत भेट घेतली. या भेटीत तालिबानच्या या नेत्याने तालिबानकडून क्रिकेटसाठी पूर्ण समर्थन असल्याचे आश्वासन दिले.
याबाबत बोलताना इस्लामिक अमीरातमुळे(तालिबान) अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटला सुरुवात झाल्याचे देखील तालिबानच्या या नेत्याने यावेळी सांगितले. याबाबत हक्कानीने हश्मतुल्ला शाहीदी आणि इतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघातील खेळाडू आणि निवडकर्त्यांसोबत चर्चा केली.
तालिबानच्या या भेटीत अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नूर अली जादरान आणि क्रिकेट बोर्डाचे माजी निवडकर्ते समितीचे अध्यक्ष असदुल्ला खान देखील यावेळी उपस्थित होते. तालिबानच्या कट्टरवादी गटातील माजी कर्णधार असगर अफगान याच्या भेटीनंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघासोबत भेट घेतल्याचे समजते. या भेटीदरम्यान असगर अफगानने तालिबानच्या कमांडोला भोजनासाठी आमंत्रित केले होते. त्याचबरोबर या कमांडो सोबत असगरने सेल्फी देखील घेतली होती.
यादरम्यान अफगाणिस्थान क्रिकेट संघाचे मुख्य क्रिकेटपटूंनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान यांसारखे खेळाडू आहेत. हे खेळाडू सध्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेच्या खेळासाठी इंग्लंडमध्ये आहेत. यापूर्वी या खेळाडूंनी जगभरातील तमाम मोठ्या नेत्यांना अफगाणिस्तानची मदत करण्याचे आवाहन केले होते.
तालिबानने काबुला काबीज केल्यानंतर तालिबानचे काही कमांडो हत्यारांसह अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या (एसीबी) कार्यालयात घुसले होते. यादरम्यान एसीबीचे कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी तालिबानचा अफगाणिस्तानच्या क्रिकेटला आणि खेळाडूंना समर्थन असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच तालिबान अफगाणिस्तानच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करणार नसल्याचे देखील आश्वासन दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हे’ खेळाडू राहणार आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर, पाहा संपूर्ण यादी
–आयपीएलमध्ये देखील ‘द हंड्रेड’च्या ‘या’ नियमाला लागू केले पाहिजे, माजी इंग्लिश खेळाडूचा सल्ला
–सारा तेंडुलकरने भाऊ अर्जुनकडे व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधनाच्या गिफ्टची मागणी, मुंबई इंडियन्सने शेअर केला खास व्हिडिओ