ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज देत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. यासह २-१ च्या फरकाने भारताने कसोटी मालिका खिशात घातली आहे. सोबतच नवा इतिहास रचला आहे.
भारताने रचला इतिहास –
हा निर्णायक सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाची गेल्या ३ दशकातील ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याची मालिका खंडीत केली आहे. साल १९८८ पासून ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारलेला नव्हता. आत्तापर्यंत सन १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे खेळलेल्या ३१ सामन्यांपैकी २४ सामन्यांमध्ये विजय मिळवले असून ७ सामने अनिर्णित राहिले. नुकताच भारताविरुद्ध झालेला चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनमध्ये झालेला ३२ वा सामना होता.
ऑस्ट्रेलियाने या मैदानावर शेवटचा पराभव १९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध स्विकारला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले होते.
तसेच आत्तापर्यंत ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या सामन्यांचा विचार करायचा झाल्यास त्यांनी या मैदानावर ६३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात पराभव स्विकारला होता. हे आठही सामने सन १९८८ च्या आधीचे आहेत. तसेच ब्रिस्बेन येथे झालेला १ सामना बरोबरीत सुटला आहे, तर १३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताने यापुर्वी एकदाही जिंकली नव्हती ब्रिस्बेन कसोटी –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेन येथे आतापर्यंत ६ कसोटी सामने झाले होते. त्यातील १ सामना अनिर्णित राहिला, तर ५ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. नुकताच दोन्ही संघात झालेला सामना या मैदानातील ७ वा सामना होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ब्रिस्बेनच्या मैदानावर भारताने पहिल्यांदा विजयी पताका झळकावली आहे.
ब्रिस्बेन कसोटी सामन्याची आकडेवारी –
ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे ३७० धावांचे भलेमोठे आव्हान उभारले होते. यात मार्नस लॅब्यूशानेच्या (१०८) झुंजार शतकाचा मोठा वाटा होता. प्रत्युत्तरात पहिल्या डावात तळातील फलंदाज वॉशिंग्टन सुंदर(६२) आणि शार्दुल ठाकूर(६७) यांच्या शतकी भागिदारीमुळे भारताने ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३४ धावांची आघाडी मिळाली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात ३४ धावांच्या आघाडीत भर पाडत ऑस्ट्रेलियाने २९४ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी भारतापुढे ३२८ धावांचे लक्ष्य होते. भारतीय युवा फलंदाज शुबमन गिल (९१ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (८९ धावा) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारत ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य पूर्ण करु शकला. भारताने दुसऱ्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर ३२९ धावा करत ३ विकेट्सने सामन्यासह मालिकाही जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या डावात विदेशात नव्वदीत बाद होणारा गिल ठरला चौथा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य तीन खेळाडू
भारताच्या नव्या ‘द वॉल’च्या खात्यात अजून एका कसोटी अर्धशतकाची भर, पण…