भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राजकोटच्या मैदानावर इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले, मार्क वुड, जो रूट आणि रेहान अहमदसारखे गोलंदाज यशस्वी जैस्वालसमोर फिके दिसत होते. यशस्वी जैस्वालने आपल्या बॅटने धमाका करत कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले आहे.
याबरोबरच यशस्वी जैस्वालने भारतीय खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांना मागे टाकले आहे. जैस्वालने एका डावात 10 षटकार मारले आहेत. तर 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका डावात 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे.
यासोबतच यशस्वी जैस्वालने एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या प्रकरणात त्याने कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 19 षटकार मारले होते, मात्र आता यशस्वीने 20 षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्ध अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत.
दरम्यान, यशस्वीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं दुसरं द्वशतक ठोकलं. यशस्वीने 236 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा केल्या. तर यशस्वीला उत्तम साथ देत सरफराज खान याने 72 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. त्याआधी शुबमन गिल याने 91 आणि सरफराज खान याने 27 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 19 धावा जोडल्या. रजत पाटीदार याला भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडकडून जो रुट, टॉम हार्टली आणि रेहान अहमद या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.