शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने कोलंबो येथे वनडे सामन्यात उतरून दौऱ्याचा शुभारंभ केला. कर्णधार म्हणून शिखर धवन प्रथमच मैदानात उतरला. यासोबतच धवनने भारताचा २५ वा वनडे कर्णधार होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे श्रीलंकेचा कर्णधार असलेला दसून शनाका हा देखील या सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करत आहे. तोदेखील श्रीलंकेचा २५ वा वनडे कर्णधार बनला. आज या लेखामधून आपण आतापर्यंत सर्वाधिक वेळा वनडे कर्णधार बदलणाऱ्या संघांविषयी जाणून घेणार आहोत.
सर्वाधिक वनडे कर्णधार बदलणारे संघ
इंग्लंड-
क्रिकेट खेळाचे जन्मदाते मानल्या जाणाऱ्या इंग्लंडने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३४ कर्णधार बदलले आहेत. इंग्लंडने खेळलेल्या पहिल्या वनडेमध्ये रे इलिंगवर्थ यांनी संघाचे नेतृत्व केले होते. सध्या इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन असून, त्याच्याच नेतृत्वात इंग्लंडने एकमेव विश्वचषक जिंकला आहे.
वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान-
इंग्लंडपाठोपाठ १९७५ व १९७९ वनडे विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीजने ३० वनडे कर्णधार बनविले आहेत. त्याचबरोबर, १९९२ विश्वचषक विजेत्या पाकिस्तानने देखील ३० कर्णधार आजमावून पाहिले आहेत. सध्या वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड तर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.
भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया-
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणारा भारतीय संघ व ऑस्ट्रेलिया यांनीदेखील प्रत्येकी २५ वनडे कर्णधार पाहिले आहेत. सध्या भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आहे. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी तब्बल ५ विश्वचषक आपल्या नावे केले आहेत. भारतीय संघाने देखील दोन विश्वचषक पटकावले. भारत आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे श्रीलंकेने देखील २५ कर्णधार बदलले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी १० कर्णधार मागील दोन वर्षात बदलले गेले. श्रीलंकेने अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वात आपला एकमेव विश्वचषक १९९६ मध्ये जिंकला होता.
या संघांनी देखील बदलले अधिक कर्णधार
विश्वविजेत्या सर्व संघांप्रमाणेच वनडे क्रिकेटचा दर्जा असलेल्या न्यूझीलंडने २३, झिम्बाब्वेने २०, दक्षिण आफ्रिकेने १७ तर, बांगलादेशने १४ वनडे कर्णधार पाहिले आहेत.
सर्वाधिक वनडे कर्णधार लाभलेले संघ –
३४ – इंग्लंड (एकूण वनडे सामने – ७६१)
३० – वेस्ट इंडिज (एकूण वनडे सामने – ८२८)
३० – पाकिस्तान (एकूण वनडे सामने – ९३६)
२५ – ऑस्ट्रेलिया (एकूण वनडे सामने – ९५५)
२५ – भारत (एकूण वनडे सामने – ९९४)
२५ – श्रीलंका (एकूण वनडे सामने – ८६२)
२३ – न्यूझीलंड (एकूण वनडे सामने – ७७५)
२० – झिम्बाब्वे (एकूण वनडे सामने – ५३४)
१७ – दक्षिण आफ्रिका (एकूण वनडे सामने – ६३१)
१४ – बांगलादेश (एकूण वनडे सामने – ३८७)
महत्त्वाच्या बातम्या –
इशान किशनला वाढदिवसाचे मिळाले खास गिफ्ट! वनडे पदार्पणासह ‘हा’ विक्रमही झाला नावावर
Tokyo Olympics: भारताची पहिली तुकडी पोहचली टोकियोमध्ये दाखल; खेळाडूंचे झाले भव्य स्वागत