२०१९ च्या सुरुवातीला श्रीलंकेचा द. आफ्रिकेतील २-० असा मालिकविजय या दशकातल्या परदेशात जाऊन मिळवलेल्या मालिका विजयांमधील सर्वोत्तम म्हणायला लागेल. मालिकेपूर्वी, दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या १७ घरगुती कसोटींपैकी १५ जिंकले होते. द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भलेभले संघ नांग्या टाकत होते. डेल स्टेनच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांपासून सर्व गोलंदाजांची सरासरी १७ पेक्षा कमी होती.
दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियाकडून २-० असा पराभूत होऊन आला होता. दोन कसोटीत श्रीलंका फक्त एकदाच २०० पार पोहोचला होता. तर, गोलंदाजदेखील फक्त १८ बळी मिळू शकले होते. श्रीलंकेने मागील १० वर्षात भारतीय उपखंडाबाहेर फक्त पाच विजय मिळवले होते. भरीस भर म्हणून, सर्वात अनुभवी अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे संघाबाहेर होता.
पहिलीच कसोटी मात्र ऐतिहासिक ठरली आणि या कसोटीचा एकमेव नायक ठरला तो म्हणजे कुसल परेरा. त्या तारखेपर्यंतची २१ व्या शतकातील ती सर्वात अविश्वसनीय खेळी होती. द आफ्रिकेच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास कुसल परेराने काढला होता.
द. आफ्रिकेने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या. श्रीलंकेचा डाव त्याच्या प्रत्युत्तरादाखल, १९१ च्या पुढे जाऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस ९० व क्विंटन डी कॉकच्या ५५ धावांच्या बळावर आफ्रिकेने, दुसऱ्या डावात २५९ धावा उभारल्या. श्रीलंकेला विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष मिळाले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा डाव पुन्हा गडगडला. ११० धावांवर पाच फलंदाज तंबूत परतले होते. कुसल परेरा व धनंजया डी सिल्वा ही जोडी जमली. आफ्रिकेच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांना धीरोदात्तपणे ते सामोरे जाऊ लागले. धनंजया डी सिल्वा अतिशय शांतचित्ताने खेळत होता. कुसल परेराने मात्र आक्रमण करण्यावर भर दिला होता.
कुसल परेरा आणि धनंजया डी सिल्वा यांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी रचल्याने सामन्याला रंगत आली. परंतु, ६.३ षटकांत चार बळी गमावल्यामुळे विजयाच्या काही अपेक्षा मिटल्यात जमा झाल्या होत्या.
या सामन्यादरम्यान आणि त्या आधीही, परेराने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धीर दाखवला होता. कागिसो रबाडा, ड्युने ऑलिव्हियर आणि डेल स्टेन या अस्सल वेगवान तिकडीने परेराला दोनदा शारीरिक प्रहार केले. एकदा डाव्या हाताला, तर दुसर्यांदा हेल्मेटवर. श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यासुद्धा झाय रिचर्डसन याचा चेंडू परेराच्या हेल्मेटवर जोरदार आदळला होता.
श्रीलंकेचा अकराव्या क्रमांकावर खेळाडू विश्वा फर्नांडो खेळायला आला तेव्हा परेराने केशव महाराजला षटकार खेचला व आपले मनसुबे जाहिर केले. दोन षटकांनंतर परेराने आपले शतक पूर्ण केले. जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील अवघे दुसरे शतक होते. सर्व श्रीलंकन खेळाडू प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले. पण, अजून श्रीलंकेसाठी दिल्ली दूर होती.
परेराने अचानक खेळाचा वेग वाढवला. एका क्षणी दक्षिण आफ्रिका विजयापासून अवघ्या एका विकेटच्या अंतरावर होती. इथेच खरी फसगत झाली, फाफ डु प्लेसिसने आपल्या गोलंदाजांना परेराच्या प्रतिहल्ल्यामुळे बचावात्मक गोलंदाजी करायला लावली.
श्रीलंकेच्या अखेरच्या ६० धावांपैकी २४ धावा या षटकाराने आल्या होत्या. काही वेळापूर्वीच परेराच्या हेल्मेटवर एक चेंडू लागला होता. ऑलीव्हियरच्या बाउन्सरवर समोर हुकचा षटकार मारत, मी असाच खेळणार हे त्याने दर्शवले होते. डु प्लेसिसने त्यामुळे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले. पण, परेराच्या डोक्यात फक्त चेंडू प्रेक्षकांत मारायचा इतकेच होते.
शतकानंतर परेराने डावाला अजून आकार दिला. शेवटच्या ६३ पैकी अवघे १३ चेंडू फर्नांडो खेळला होता. डु प्लेसिस वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत होता. परेरा मात्र आपल्या आवाक्यात असलेला प्रत्येक चेंडू चौकाराच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होता.
दुसरा नवा चेंडू घेतल्यावर त्याने पहिल्या तीन षटकांत २७ धावा फटकावल्या. या हल्ल्यामुळे श्रीलंका विजयापासून फक्त १४ धावा दूर होता. परेराने स्टेनला डीप मिड विकेटवर उत्तुंग षटकार लगावला. यानंतर त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जीवाच्या आकांताने धावत एक धाव पूर्ण करून स्ट्राइक आपल्याकडे राखली.
रबाडाच्या षटकात लेग बायच्या दोन धावा आणि नंतर थर्ड मॅनला चौकार मारत कसोटी सामन्यांच्या इतिहासातील सर्वात अनपेक्षित धावांचा पाठलाग जवळजवळ एकट्याने पूर्ण केला. श्रीलंकेने द. आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. परेरा २०० चेंडूत १५३ धावा करून नाबाद राहिला. यात १२ सणसणीत चौकार व ५ गगनभेदी षटकार सामील होते. अकराव्या क्रमांकावरील विश्वा फर्नांडोने देखील २७ चेंडू खेळून काढत परेराला भक्कम साथ दिली होती.
गोलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या डर्बनच्याच्या खेळपट्टीवर कुसल परेराने ‘ न भुतो न भविष्यती ‘ अशी खेळी साकारली होती. दर्जेदार वेगवान गोलंदाजांना एकट्याने सामोरे जाण्याचे धाडस त्यांने दाखवले आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कायमचे कोरले.
ट्रेंडिंग लेख –
संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पहात नाही एकमेकांचे तोंड
संघातील आपल्याच सहकाऱ्यावर भारतीय क्रिकेटरने निशाना साधल्याच्या ५ घटना
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..






