भारताच्या इतिहासातील महान गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे रविवारी (६ जानेवारी) सकाळी आजारपणामुळे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती, परंतु त्यानंतर त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर आणि भारतीय क्रिकेट यांचे एक अतूट नाते होते आणि भविष्यात त्याची नेहमीच आठवण काढली जाईल. बीसीसीआयकडून त्यांच्यासाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन सिट्स राखीव ठेवल्या जायच्या.
कपिल देव यांच्या (Kapil Dev) नेतृत्वातील भारतीय संघाने जेव्हा १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी खेळाडूंकडे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या एनकेपी साळवे यांनी या आर्थिक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राजसिंह डूंगरपुर यांच्याशी संपर्क साधला. डूंगरपुरांनी त्यांची मैत्रीण आणि क्रिकेटप्रेमी लता मंगेशकर यांच्यापुढे हा प्रश्न मांडला. त्यानंतर लता मंगेशकरांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यातून मिळालेल्या पैशांमधून विश्वचषक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये दिले.
विश्वचषकविजेत्या खेळाडूने काढली आढवण
१९८३ विश्वचषकविजेत्या संघात सहभागी असलेले सुनील वलसान याविषयी बोलताना म्हणाले की, “त्यावेळी ही मोठी रक्कम होती. नाहीतर आम्हाला दौऱ्यासाठी मिळणारे पैसे आणि दैनिक भत्त्याचे पैस एकत्र गोळा करावे लागले असते, जे ६०००० रुपये झाले असते. काही लोकांनी आम्हाला ५००० किंवा १०००० हजार रुपये देण्याचा शब्द दिला. हे खूप अपमानास्पद होते. पण नंतर लताजींनी कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम कमाल झाला होता आणि त्यांना प्रत्यक्ष गाणं म्हणताना पाहणे अविस्मरणीय होते.”
लताजींसाठी प्रत्येक सामन्यात राखीव ठेवली जायची दोन व्हीआयपी तिकिटे
बीसीसीआयनेही लता मंगेशकरांच्या या योगदानाचा विसर पडू दिला नाही. त्यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयने प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी स्टेडियममध्ये दोन व्हीआयपीए पास राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एका बीसीसीआय अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितेल की, “ज्याप्रकारे प्रत्येक सामन्यात आम्ही स्पोन्सर्स, स्टेट एसोसिएशन यांच्यासाठी कोटा ठेवतो, त्याचप्रकारे लताजींसाठी प्रत्येक सामन्यात दोन तिकिटे राखीव ठेवली जात असायची.” लता मंगेशकर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून अनेकदा वेळ काढून मैदानात क्रिकेट पाहण्यासाठी उपस्थित राहत असायच्या.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा १००० वा वनडे! वाचा जलद शतक ते सर्वोत्तम गोलंदाजी पर्यंतची वनडे इतिहासातील खास आकडेवारी