क्रिकेटची सुरुवात जरी इंग्लंडमध्ये झाली असली तरी, क्रिकेटला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी दक्षिण आशिया व भारतीय उपखंडातच मिळाली. भारतीय उपखंडातील असा एकही देश नाही ज्या देशात क्रिकेट खेळले जात नाही. या सर्व देशांतील रहिवासी देखील हाडाचे क्रिकेटप्रेमी आहेत. भारत, पाकिस्तान व श्रीलंका या देशांनी क्रिकेटचे विश्वचषक जिंकले व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. पंचवीस वर्षांपूर्वी बांगलादेशने देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून बरीच प्रगती केली आहे.
सध्या या प्रस्थापित भारतीय उपखंडातील देशांना एक देश टक्कर देत आहे. भारत व पाकिस्तानचा शेजारी असलेला हा देश म्हणजे अफगाणिस्तान. कायम युद्धाच्या सावटाखाली असलेल्या देशाने फक्त दहा वर्षाच्या काळात इतकी प्रगती केली आहे की, त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणारे राष्ट्र म्हणून मान्यता देखील मिळवली. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने क्रिकेटच्या पटलावर छाप पाडणारा देश म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जात आहे.
खरंतर, खेळाडूंच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या व अफलातून कामगिरीच्या बळावर अफगाणिस्तान क्रिकेटने ही जागा मिळवली आहे. मात्र, त्यातही काही असे खेळाडू आहेत ज्यांना, खऱ्या अर्थाने अफगाणिस्तान क्रिकेटचा चेहरा म्हणून ओळखले जाते. त्यापैकी एक असलेला, अवघ्या २३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज झालेला अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानचा आज वाढदिवस.
२० सप्टेंबर १९९८ ला अफगाणिस्तानातील नंगरहार या काबुल जवळच्या छोट्याशा गावात राशिदचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव राशिद खान अरमान. राशिदच्या परिवारात ६ भाऊ व ४ बहिणींचा समावेश होतो. राशिद त्यापैकी सहाव्या क्रमांकाचे अपत्य. अफगाणिस्तान कायम दहशतीच्या सावटाखाली असल्याने, राशिदच्या परिवाराने पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा याठिकाणी काही काळ वास्तव्य केले. याच ठिकाणी मुलांना क्रिकेटची गोडी लागली. राशिदचे मोठे भाऊ आमिर व इम्रान हे देखील क्रिकेट खेळत. राशिदला पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याचा खेळ आवडत. त्यामुळे राशिदने आफ्रिदीप्रमाणे लेगब्रेक गोलंदाजी करायला सुरुवात केली.
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून राशिद अफगाणिस्तान क्रिकेट वर्तुळात मोठे नाव बनू लागला होता. अशातच, २०१४ मध्ये एका मालिकेसाठी पाकिस्तानी दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक यांना अफगाणिस्तानचे प्रशिक्षक बनविण्यात आले. संघव्यवस्थापकाच्या सांगण्यावरून, इंजमाम यांनी राशिदला चाचणीसाठी बोलवले. १६ वर्षाच्या राशिदने इंजमाम यांना इतके प्रभावित केले की, त्यांनी त्याची शिफारस निवड समितीकडे केली. निवड समितीने राशिदला संघात सामील करून घेण्यास नकार दिला. शेवटी, इंजमाम यांनी प्रशिक्षकपद सोडण्याची धमकी दिल्यानंतर राशिदचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर, झिम्बाब्वे दौर्यावर २०१५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी राशिदने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्यानंतर इतिहास घडत गेला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले दोन वर्ष त्याला मुख्य संघांविरुद्ध जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, सहयोगी देशांविरुद्ध त्याची कामगिरी चमकदार होती. राशिदच्या आयुष्यात २०१७ हे वर्ष टर्निंग पॉइंट ठरले. त्या वर्षी त्याला आयसीसीचा सहयोगी देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. २०१७ च्या आयपीएलसाठी सनरायझर्स हैदराबादने तब्बल ४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले. १९ व्या वर्षी इतकी मोठी रक्कम मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला.
आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात १७ बळी मिळवले. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राशिद एक अव्वल फिरकीपटू म्हणून पुढे येत होता. त्याला आयपीएल पाठोपाठ बिग बॅशमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स व सीपीएलमध्ये गयाना ॲमेझॉन वॉरियर्स या संघांनी करारबद्ध केले. त्याच वर्षी जून महिन्यात, वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १८ धावांत ७ बळी घेण्याची विक्रमी कामगिरी त्याने नोंदवली.
२०१८ च्या सुरुवातीला, टी२० व वनडे गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत तसेच टी२० अष्टपैलू क्रमवारीत त्याने अव्वलस्थान पटकावत अफगाणिस्तान क्रिकेटची मान उंचावली. राशिद खऱ्या अर्थाने आयपीएल २०१८ मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. २०१८ आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने आरटीएम कार्ड वापरत, तब्बल ९ कोटी रुपये देत राशिदला आपल्या संघात कायम ठेवले. संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत राशिदने सनरायझर्सला अंतिम फेरीपर्यंत नेले. क्वालिफायर सामन्यात केकेआरविरुद्ध १० चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी करत त्याने सामना फिरवला होता. गोलंदाज म्हणून संपूर्ण स्पर्धेत २१ गडी त्याने टिपले. या कामगिरीमुळे भारतीय प्रेक्षक त्याच्यावर इतके खुश होते की, राशिदला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी अनेकांनी भारत सरकारकडे केली होती. त्यासाठी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात मोहीम चालवली गेली. त्याच वर्षी, अफगाणिस्तानने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला. त्या अफगाणिस्तान संघातही राशिदचा समावेश होता.
२०१९ विश्वचषकातील अफगाणिस्तानच्या खराब कामगिरीनंतर, राशिदला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार म्हणून पहिली कसोटी खेळताना त्याने बांगलादेश विरुद्ध १० बळी मिळवत, बांगलादेशला २२४ धावांनी पराभूत करताना अफगाणिस्तानला पहिलावहिला कसोटी विजय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकही असा समीक्षक अथवा माजी खेळाडू नाही ज्याने राशिदचे कौतुक केले नाही. जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी राशीत खेळण्यास जातो त्या सर्व ठिकाणी त्याला भरपूर प्रेम मिळते. भारताला तो आपले दुसरे घर म्हणून संबोधतो.
खऱ्या अर्थाने अष्टपैलू असलेला राशिद आता आयपीएलचा तेरावा हंगाम गाजवण्यास सज्ज आहे. युएईमधील फिरकी गोलंदाजांना पूरक असणाऱ्या खेळपट्ट्यांवर राशिद धुमाकूळ घालणार यात कसलीही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी
‘आय सब्जी नही पोहे बनेंगे’, शिखर धवन-पृथ्वी शॉ जोडीचा भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल
रोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का? कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर