मुंबई क्रिकेटने जगाला आतापर्यंत अनेक हिरे दिले आहेत. विजय मर्चंट, विजय हजारे, पॉली उम्रीगर यांपासून सुरू झालेली परंपरा पुढे सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर ते आजचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ हे आंतररष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत.
पण ही झाली नाण्याची एक बाजू, दुसऱ्या बाजूला असे अनेक खेळाडू आहेत ज्यांत प्रतिभा ठासून भरलेली असतानाही ते कधीही भारतासाठी खेळू शकले नाहीत. यात पद्माकर शिवलकर, अमोल मुजुमदार ही नावे प्रामुख्याने समोर येतात. या व्यतिरिक्त अजून एक खेळाडू आहे जो, भारतीय संघ तर दूरच पाच वर्ष आयपीएल संघात असून अवघा एक सामना खेळू शकला आहे. तो खेळाडू म्हणजे, मुंबईकर सिद्धेश लाड. याच सिद्धेशचा आज २९ वा वाढदिवस आहे.
सिद्धेशचे वडील दिनेश लाड हे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते. रोहित शर्मा, शार्दुल ठाकुर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारताला देणारे प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. घरातच प्रशिक्षक असल्याने सिद्धेशचे क्रिकेटकडे आकर्षित होणे स्वभाविक होते. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या हातात बॅट देऊन त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट खेळण्याचा श्रीगणेशा केला. सिद्धेशमध्ये क्रिकेटचे गुण उपजत आले होते. आपल्या कमालीच्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर त्याने मुंबईच्या प्रत्येक वयोगट संघाचे प्रतिनिधित्व केले. शालेय क्रिकेट गाजवल्यानंतर त्याने युनिव्हर्सिटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये वेस्टर्न वोल्वस संघाचे नेतृत्वही केले.
२०१३ मध्ये २१ व्या वर्षी, सौराष्ट्र विरुद्ध त्याने रणजी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावत त्याने आपली निवड सार्थ केली. २०१४ व २०१५ रणजी हंगामात १९ सामन्यात १,४०० धावा फटकावून तो चर्चेत आला. सिद्धेशच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी २०१५-२०१६ रणजी अंतिम फेरीत आली. सौराष्ट्र विरुद्ध त्याच्या, १०१ चेंडूत केलेल्या ८८ धावांच्या खेळीमुळे मुंबईला विजेतेपद पटकावता आले.
गेली सहा वर्ष क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तो मुंबईचा “मिस्टर डिपेंडेबल” म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या प्रकारानुसार आपला खेळ बदलण्याची त्याची शैली वादातीत आहे. सर्वांगसुंदर फलंदाजी सोबतच आपल्या ऑफस्पिनने देखील त्याने अनेक सामने मुंबईला जिंकून दिले आहेत. २०१७-२०१९ अशी तीन वर्षे त्याने मुंबईचे कर्णधारपद देखील भूषवले.
२०१५ आयपीएल लिलावात, घरच्या मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले. मात्र, आपला पहिला आयपीएल सामना खेळण्यासाठी २०१९ उजडावे व रोहित शर्माला दुखापतग्रस्त व्हावे लागले. सलग पाच वर्ष बाके गरम केल्यानंतर सिद्धेशने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध आपले आयपीएल पदार्पण केले. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सर्वांची वाहवा मिळवली. पण, पुढील सामन्यात रोहित शर्मा बरा होऊन परतल्याने त्याला वगळण्यात आले.
तसे पाहायला गेले तर, सिद्धेश भारतीय संघाच्या आसपास आहे. गेली तीन वर्ष तो सातत्याने दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी तसेच भारत अ संघाकडून खेळत आहे. आपल्या लाजबाब तंत्राने व मोठ्यामोठ्या खेळ्या करायच्या कौशल्याच्या जोरावर त्याने या सर्व संघात आपली जागा टिकवून ठेवली आहे.
प्रथमश्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये चाळीसपेक्षा अधिक सरासरी असलेल्या सिद्धेशची प्रतिभा ओळखून कोलकाता नाईट रायडर्सने २०२० आयपीएल लिलावात पूर्वी त्याला ट्रेड करून आपल्या संघात सामील केले. २०२० च्या सुरुवातीला झालेल्या, प्रतिष्ठित डीवाय पाटील टी२० स्पर्धेत इंडियन ऑइलचे नेतृत्व करताना त्याने इंडियन ऑइलला विजेतेपद मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
प्रतिभेची खाण! अवघ्या १७ सामन्यात ११७ विकेट्स अन् ६३१ धावा, ‘हा’ अष्टपैलू ठोठावतोय टीम इंडियाचं दार
WTC अंतिम सामन्यात ‘ही’ तिकडी करेल न्यूझीलंडची पळता भुई थोडी; नेहराचा टीम इंडियाला गुरुमंत्र