ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच कसोटी मालिका सुरु आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या २ दिवशी चांगला खेळ केला होता. भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडीही घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्या तिखट आक्रमणासमोर भारतीय फलंदाजी आश्चर्यकारकरित्या ढासळली. या डावात भारताच्या एकाही फलंदाजासा दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
भारतीय संघाच्या ९ विकेट गेल्या असतानाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फलंदाजीवेळी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे भारतीय संघाला हा डाव ३६ धावांवरच थांबवावा लागला. परिणामत: ऑस्ट्रेलियाला ९० धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स गमावत २१ षटकात सहज पार केले.
भारताची निचांकी धावसंख्या –
ऍडलेड कसोटीत भारतीय संघाचा दुसरा डाव ३६ धावांवर संपुष्टात आल्याने ही कसोटी क्रिकेटमधील भारताची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. याआधी ४२ धावा ही भारताची कसोटीतील निचांकी धावसंख्या होती. हा नकोसा विक्रम ४६ वर्षांपूर्वी जूनमध्ये लॉर्ड मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघाने केला होता.
विशेष म्हणजे भारताच्या ४६ वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर झालेल्या आणि नुकत्याच ऍडलेडवर पार पडलेल्या कसोटी सामन्यात काही समानता आहेत.
काही योगायोग –
१९७४ ला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ६२९ धावा केल्या होत्या. तर भारताला पहिल्या डावात ३०२ धावाच करता आल्याने ३२७ धावांनी पिछाडीवर रहावे लागले होते आणि त्यामुळे इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला होता. त्यानंतर भारतीय संघाचा दुसरा डाव ४२ धावांवर संपुष्टात आला होता.
त्यावेळी दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या ९ विकेट्स गेल्या होत्या आणि भागवत चंद्रशेखर दुखापतीमुळे एबसेंट हर्ट राहिले होते. तर ऍडलेड कसोटीत शमी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे भारताचा दुसरा डाव ९ व्या विकेटनंतर संपुष्टात आला.
तसेच १९७४च्या लॉर्ड्स कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात क्रिस ओल्ड यांनी ५ आणि ज्यॉफ अर्नाेल्ड यांनी ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर ऍडलेड कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने ५ आणि पॅॅट कमिन्सने ४ विकेट्स घेतल्या.
‘काही समजायच्या आत भारत सामना हारला होता’
लॉर्ड्सच्या या कसोटी सामन्याच्या आठवणीबद्दल गावसकरांनी त्यांच्या ‘सनी डेज’ या आत्मचरित्रातही लिहिले आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की ते पायचित बाद झाल्यानंतर त्यांचा लेग गार्ड काढेपर्यंत ७ विकेट्सही गेल्या होत्या आणि काही समजायच्या आतच भारताचा डावही संपला होता. इंग्लंडने सामना २८५ धावांनी जिंकला होता.
त्यावेळी भारताच्या दुसऱ्या डावात केवळ एकनाथ सोलकर यांनी दुहेरी धावसंख्या पार केली होती. ते १८ धावांवर नाबाद राहिले होते. त्या सामन्यात भारताचे नेतृत्व अजित वाडेकर करत होते. ते ६ चेंडू खेळून ३ धावांवर बाद झाले होते. त्यांना ओल्ड यांनी त्रिफळाचीत केले होते.
या सामन्यानंतर भारतीय संघाला आणि कर्णधार अजित वाडेकर यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. एका पार्टीत भारतीय उच्चायुक्तने भारतीय संघाला निघून जाण्यासही सांगितले होते. पण नंतर त्यांनी वाडेकर यांची माफी मागितली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
….म्हणून विदेशात पंतला द्यावी प्रथम पसंती; माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांचे मत
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
लिओनेल मेस्सीची महान फुटबॉलपटू पेलेंच्या विश्वविक्रमाची बरोबरी, पाहा काय केलाय पराक्रम