मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्सने रविवारी सलग ८ वा पराभव स्विकारला. मुंबईला रविवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध ३६ धावांनी आयपीएलच्या ३७ व्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हा मुंबईचा हंगामातील सलग ८ वा पराभव ठरला. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल हंगामात पहिले ८ सामने सलग हरणारा पहिला संघ ठरला आहे.
मुंबईचा ८ वा पराभव
रविवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुलच्या नाबाद १०३ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद १६८ धावा केल्या. मुंबईकडून राईल मेरिडीथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तसेच तिलक वर्माने ३८ धावा केल्या. बाकी कोणाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत १३२ धावाच करता आल्या आणि ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
मुंबईच्या या पराभवानंतर सध्या संघावर टीका होत आहे. मुंबई आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच संघातच्या कमजोरीबद्दलही सध्या बोलले जात आहे. या लेखातूनही आपण मुंबईकडून झालेल्या ३ कमजोरींबद्दल जाणून घेऊ, ज्यामुळे त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे.
गोलंदाजीत बुमराहला मिळेना साथ
मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी फळी मोठी कमजोरी ठरत आहे. सध्या संघात जसप्रीत बुमराह अनुभवी गोलंदाज आहे. पण, त्याला संघातील अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळत नाही. यापूर्वी मुंबई संघात बुमराहच्या जोडीला ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा सारखे गोलंदाज होते. मात्र, आयपीएल २०२२ च्या हंगामात ही कमी मुंबई इंडियन्सला जाणवत आहे. सध्या मुंबईकडून टायमल मिल्स, जयदेव उनाडकट आणि बासिल थम्पी यांसारख्या गोलंदाजांनी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अद्याप अपेक्षित असे यश मिळालेले नाही.
फलंदाज मोक्याच्या क्षणी अपयशी
मुंबई इंडियन्ससाठी केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीही डोकेदुखी ठरत आहे. ८ व्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानेही मान्य केले आहे की, स्पर्धेत संघाची फलंदाजी चांगली झालेली नाही. इशान किशन आणि रोहित दोघेही संघाचा चांगली सुरुवात मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव वाढत आहे, परिणामी मधल्या फळीतही कोणी फार काही खास करताना दिसून आलेले नाही. पण, यासाठी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव अपवाद ठरले आहेत. या दोघांनीच मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. बाकी जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरताना दिसत आहेत. युवा डेवाल्ड ब्रेविसने २-३ सामन्यात प्रतिभा दाखवली होती. पण, तोही अद्याप मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.
अष्टपैलू खेळाडूंची कमी
मुंबई इंडियन्स संघ आत्तापर्यंत चांगल्या अष्टपैलू खेळाडूंसाठीही ओळखला जायचा. पण यंदा कायरन पोलार्ड त्यांच्या संघातील एकमेव अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. पण तोही चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईला यंदा अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवत आहे. यापूर्वी हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू पोलार्डसह अष्टपैलू म्हणून मुंबईकडून खेळताना दिसायचे. मात्र, या दोघांनाही मुंबईने आयपीएल २०२२ पूर्वी मुक्त केले होते. त्यामुळे आता मुंबईला त्यांची कमी भरून काढणारे पर्याय मिळालेले नाहीत. त्यामुळे मुंबईला संघात समतोल साधताना समस्या निर्माण होताना दिसत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यामुळे’ सचिन सेहवागला नेहमी चारायचा केळी, खास दिवशी विरूने दिला जुन्या आठवणीला उजाळा
क्रिकेटर नसता, तर कोण झाला असता जोस बटलर? आर अश्विनला दिले ‘हे’ उत्तर
कोणासी सांगावे कळेना! ‘माझे अर्धे पैसे दंड भरण्यातच जातात’, सामना विजयानंतर केएल राहुलचे गाऱ्हाणे