क्रिकेटविश्वात वादाची कधीच कमी राहिली नाही. दोन संघातील खेळाडूंमधील वाद बर्याच प्रमाणात पाहिले गेले आहेत, तर एकाच संघातील दोन खेळाडूंमधील अनेक वादही ऐकले आणि पाहिले आहेत. परंतु, नेहमीच एका खेळाडूने दुसर्या खेळाडूबद्दल लोकांसमवेत बोलताना सावधगिरी बाळगली जाते.
क्रिकेटमध्ये शक्यतो, एखादा खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंबद्दल जाहीरपणे काही बोलत नाही. कोणत्याही प्रकारचे मतभेद असले तरी, अनेकदा वाद टळावा म्हणून खेळाडू काहीवेळा माघार घेतात.
भारतीय क्रिकेटमध्ये मात्र, अनेकदा आपल्याच देशाच्या सहकारी खेळाडूंवर वादग्रस्त विधान करून वाद निर्माण केलेला आहे. आज, अशाच पाच घटनांवर एक नजर टाकुया.
१) जेव्हा धोनीने वरिष्ठ खेळाडूंना सुस्त क्षेत्ररक्षक म्हटले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा एक अतिशय हुशार कर्णधार मानला जात. तो कायम विचारपूर्वक बोलणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. धोनी आपल्या कारकीर्दीत फारसा वादात पडला नव्हता. पण एकदा त्याने भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडूंबद्दल भाष्य केले आणि मोठा वाद निर्माण झाला.
२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या सीबी सिरीजमध्ये धोनीने नाव न घेता भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांना सुस्त क्षेत्ररक्षक म्हटले.
” त्या तिघांना एकत्र खेळता येणार नाही, तिघांपैकी दोघांना संधी दिली जाईल आणि तिसरा एक युवा खेळाडू असेल. ”
असे वक्तव्य केले होते. त्यानंतर नव्या वादाचा जन्म झाला, जो बराच काळ चालला होता.
२) वीरेंद्र सेहवागने दिले होते ‘ सुस्त क्षेत्ररक्षक ‘ प्रकरणावर उत्तर
२०१२ सीबी सिरीजमधील ‘सुस्त क्षेत्ररक्षक’ प्रकरण चांगलेच गाजले होते. धोनी भारतीय संघाचा कर्णधार असताना, त्याने सचिन, सेहवाग आणि गंभीर यांना सुस्त क्षेत्ररक्षक म्हटलेले. यानंतर रोटेशन पॉलिसीअंतर्गत या तिन्ही खेळाडूंना संघात खेळायला दिले जात होते. या मालिकेतील एका सामन्यात धोनी खेळला नाही तेव्हा वीरेंद्र सेहवागने कर्णधारपद सांभाळले.
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सेहवागने शानदार झेल टिपला. त्यानंतर पत्रकार परिषदेत धोनीचे नाव न घेता सेहवाग म्हणाला, “तुम्ही माझा झेल पाहिला का ? ” अशाप्रकारे सेहवागनेही धोनीला विनोदी पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
३) धोनीच्या खेळीविषयी गंभीरचे वक्तव्य
भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्यातील तणावाचे संबंध कुणापासून लपलेले नाहीत. गंभीर आणि धोनी यांच्यात बर्याच वर्षांपासून वाद होता. गौतम गंभीर कायम धोनीला उत्तर देण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे २०१२ च्या सीबी सिरीजमध्ये धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकात धोनीने संघाला विजय मिळवून दिला पण गौतम गंभीर मात्र यावर खूष नव्हता. अशा परिस्थितीत गंभीरने सामन्यानंतर सांगितले की, ” अशाप्रकारे, शेवटच्या षटकापर्यंत सामना कधीही नेऊ नये. सामना आधीच संपविला जाऊ शकला असता. ”
४) अनिल कुंबळे यांचे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना केलेले वादग्रस्त विधान
भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. अनिल कुंबळे यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. परंतु, सन २०१७ मध्ये कुंबळे यांनी अचानक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ” कर्णधार विराट कोहलीला माझी शैली आवडत नाही म्हणून मी राजीनामा दिला आहे. ”
अनिल कुंबळे यांच्या या विधानानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी कुंबळे यांना ट्रोल केले होते.
५) संजय मांजरेकर यांची रवींद्र जडेजावर टीका
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक म्हणून संजय मांजरेकर जगप्रसिद्ध आहेत. मांजरेकर यांची अनेक भाष्यं वादाला कारणीभूत ठरली आहेत. त्याचप्रमाणे, संजय मांजरेकर यांनी २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान रवींद्र जडेजावर भाष्य केले होते. ज्यामध्ये त्यांनी रवींद्र जडेजाला ‘बिट्स अँड पीस प्लेयर’ असे म्हटले होते. पण त्यानंतर, जडेजाने उपांत्य फेरीत संजय मांजरेकर यांना अष्टपैलू कामगिरी करून दाखवत आरसा दाखविला.
या घटनेनंतर, संजय मांजरेकर यांना बीसीसीआयच्या समालोचक विभागातून काढून टाकण्यात आले.