जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्याच दिवसापासून फिरकी घेणाऱ्या आणि असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवरही भारतीय फलंदाजांनी उत्तम कौशल्य दाखवत धावा उभारल्या.
भारताकडून रोहित शर्माने १६१ धावांची तर अजिंक्य रहाणेने ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी उभारली. मात्र अजिंक्य रहाणे ६६ धावांवर खेळत असताना मैदानात एक वादग्रस्त प्रसंग घडला. तिसऱ्या पंचांनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूट भलताच निराश झाला होता.
नेमके काय घडले?
भारताची फलंदाजी चालू असताना तिसऱ्या सत्रात अजिंक्य रहाणे ६६ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू रहाणेच्या पॅडला लागून हवेत उडाला आणि शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या ओली पोपच्या हातात जाऊन विसावला. ते पाहताच इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले, मात्र मैदानावरील पंचांनी रहाणेला नाबाद घोषित केले.
परंतु, रहाणे आउट आहे असा विश्वास असल्याने इंग्लंडने डीआरएसची मदत घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी पाहिलेल्या रिप्लेमध्ये रहाणेच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला नव्हता. पण इंग्लंडच्या खेळाडूंनी पंचांकडे पुन्हा रिप्ले पाहण्याची मागणी केली. त्यांच्या मते चेंडू रहाणेच्या पॅडला लागायच्या आधी नव्हे तर पॅडला लागल्यानंतर बॅटला लागला होता. मात्र पंचांनी तो रिप्ले न पाहताच रहाणेला नाबाद घोषित केले.
रिप्लेत बॅटला चेंडू लागल्याचे झाले स्पष्ट
पंचांनी नाबाद दिल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. मात्र त्यांनतर पाहिल्या गेलेल्या रिप्लेत चेंडूने पॅडला लागल्यानंतर बॅटची कडा घेतल्याचे स्पष्ट झाले. हे बघून कर्णधार जो रूट चांगलाच निराश झाला होता. तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही अशी चूक झाल्याने जो रूटसह इंग्लंडचे खेळाडू वैतागलेले दिसले.
https://twitter.com/i/status/1360550999534886917
अर्थात या चुकीच्या निर्णयाचा इंग्लंडला फारसा फटका बसला नाही. अजिंक्य रहाणे त्यानंतर आपल्या वैयक्तिक धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घालून माघारी परतला. परंतु, इंग्लंडला डीआरएसची एक संधी गमवावी लागल्याने उर्वरित डावात त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पंचांनी अधिक काळजीपूर्वक काम करायला हवे, असे मत माजी खेळाडूंनीही या प्रकारानंतर व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
जेव्हा रोहितने वाढवले रितीकाचे टेन्शन, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ