सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी टीका करण्यात आली, याबाबत भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तक्रार केली होती. यानंतरही रविवारीदेखील(१० जानेवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशी हाच प्रकार पुन्हा होताना दिसला. त्यामुळे सध्या क्रिकेट क्षेत्रातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता याबाबत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीनेही राग व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण –
शनिवारी भारतीय संघाने त्यांच्या खेळाडूंवर प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी टीका होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी जेव्हा दुसऱ्या सत्रात सिराज बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा प्रेक्षकांमधून काही जणांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टीका केली. यानंतर सिराजने खूपवेळ वाट न पाहाता याबाबत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेला माहिती दिली.
रहाणेनेही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पंचांकडे तक्रार केली. त्यामुळे लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेथून सिराजवर टीका करण्यात येत होती तिथे जाऊन चौकशी केली आणि चार-पाच लोकांना पोलिसांनी स्टँडबाहेर नेले. या दरम्यान जवळपास १० मिनिटे खेळ थांबला होता. या प्रकरणाचे पडसाद क्रिकेट क्षेत्रात उमटत असून अनेकांनी अशा टीक करणाऱ्या लोकांवर राग व्यक्त केला आहे.
तसेच काही खेळाडूंनी यापूर्वी क्रिकेट सामने खेळताना अशा गोष्टींचा सामना केला असल्याचे बोलून दाखवले आहे.
विराटने व्यक्त केली निराशा –
या प्रकरणाबाबत विराटने ट्विट केले आहे की ‘वर्णद्वेषी टीका ही गोष्ट बिलकूलच स्विकारली जाणार नाही. बाऊंड्री लाईनवर असताना अनेक वाईट गोष्टी ऐकण्याच्या अनुभवातून गेलो आहे, पण ही रावडी वागणूकीची हद्द आहे. मैदानात असे घडत आहे, हे दुर्दैवी आहे. या घटनेकडे तात्काळ आणि गंभीरतेने पाहाण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन एकदाच या गोष्टींचा निवारा होईल.’
Racial abuse is absolutely unacceptable. Having gone through many incidents of really pathetic things said on the boundary Iines, this is the absolute peak of rowdy behaviour. It's sad to see this happen on the field.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
The incident needs to be looked at with absolute urgency and seriousness and strict action against the offenders should set things straight for once.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्टेटमेंट –
या प्रकरणाबाबत रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदन जाहीर केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे की प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद टीकेला कधीही सहन करण्यात येणार नाही. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडक पावले उचलेल. याबरोबरच त्यांनी यजमान म्हणून भारतीय संघाची माफी मागितली असून अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेऊ असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“टीम इंडिया दुसऱ्या डावात २०० धावा देखील करु शकणार नाही”, पहा कोणी केलंय हे वक्तव्य
आयपीएलच्या हंगामातून माघार घेणारा डेल स्टेन खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये
रोहित-गिल जोडीची लाजबाव कामगिरी! मागील ५२ वर्षात कुणालाही न जमलेला विक्रम केला नावावर






