आयपीएलमध्ये जेव्हा कधी विलक्षण चपळाईने विकेटकिपींगचा उल्लेख केला असता सर्वांना एमएस धोनीच आठवतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का की, एकाच सामन्यात झेल आणि स्टम्पिंग करत तब्बल पाच फलंदाजांना बाद करण्याचा त्याच्या नावावर नाही. आयपीएलच्या इतिहासात केवळ एकाच विकेटकिपरने एकाच डावात सर्वाधिक असे ५ झेल घेतले आहेत.
आयपीएलच्या एकाच डावात ५ खेळाडूंना बाद करण्याचा पराक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराने केला आहे. तो ही एक उत्तम विकेटकिपर असून त्याने त्याच्या विकेटकिपींगने चाहत्यांची मने जिंकली आहेत. संगकाराने आयपीएलच्या चौथ्या हंगामात ही विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सचे नेतृत्व करताना विकेटकीपरचीही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.
संगकाराने आयपीएलमधील ही विशेष कामगिरी तिलकरत्ने दिलशान, विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांसारख्या स्फोटक फलंदाजांविरुद्ध केली आहे. धोनीला जगातील सर्वात वेगवान विकेटकीपर मानले जाते. त्याने ०.०८ च्या सेंकदाने स्टम्पिंगचा विश्वविक्रम केला आहे, मात्र त्याला एकाच सामन्यात ५ झेल घेण्याची संधी मिळाली नाही.
संगकाराने दिलशान (७ धावा), डिविलियर्स (०), योहान वॅन डर वथ (०), सौरभ तिवारी (७)आणि रायन निनन (३) यांना यष्टीमागे झेलबाद केले. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे डेक्कन चार्जर्सने तो सामना ३३ धावांनी जिंकला.
हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०११ हंगामाच्या ११ व्या सामन्यात चार्जर्सने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी ५ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या होत्या. त्यामध्ये चार्जर्सकडून भरत चिप्लीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ३५ चेंडूमध्ये नाबाद ६१ धावा केल्या. झहीर खानने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने ९ विकेट्स गमावत १४२ धावाच केल्या. त्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ७१ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (२५ धावा) आणि मयंक अग्रवालने (१६ धावा) हे वगळता बाकी आरसीबीचे फलंदाज दुहेरी आकडासुद्धा गाठू शकले नाही. चार्जर्सकडून डेल स्टेन आणि मनप्रीत गोनी यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.






