1. सचिन तेंडूलकर: क्रिकेटमधील परिपूर्ण खेळाडू म्हणून ज्याचा आदर्श घेतला जातो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सचिनने पहिला वनडे सामना 18 डिसेंबर 1989ला पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याला वकार युनूसने शून्य धावेवर बाद केले. मात्र त्यानंतर सचिनने मागे वळून न पहाता, अनेक यशाची शिखरे गाठली.
त्याने 22 वर्षाच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून 463 वनडे सामन्यात खेळताना 44.83 च्या सरासरीने तब्बल 18,426 धावा केल्या. यात सर्वाधिक 49 शतके आणि 96 अर्धशतके त्याने केली आहेत.
तसेच वनडेतील पहिले द्विशतकही सचिनने द. आफ्रिकेविरुद्ध 2010 मध्ये केले. तर सर्वाधिक वनडे विश्वचषकात खेळण्याचा मानही सचिनने मिळवला. 2011 चा विश्वचषक त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा ठरला. त्यानंतर एक वर्षातच त्याने 18 मार्च 2012 ला वनडेतून निवृत्ती घोषित केली.
2. कुमार संगकारा: श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराने 15 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरीने श्रीलंकेचा फक्त एक फलंदाज म्हणूनच नाही तर एक उत्तम यष्टीरक्षण आणि एक चांगला संघनायक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
त्याने 5 जुलै 2000 ला पाकिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण केले. पदार्पणाच्या या सामन्यात त्याने सुरवात तर चांगली केली होती परंतू त्याला 35 धावांवर असताना धावबाद करण्यात इम्रान नाझीरला यश आले.
यानंतर पुढील कारकिर्दीत संगकाराने त्याच्या शैलीदार फलंदाजीने सर्वांचीच मने जिंकली. त्याने श्रीलंकेबरोबरच आशिया आणि आयसीसीच्या संघाचेही प्रतिनिधित्व केले.
त्याने 404 वनडे सामन्यात 41.98च्या सरासरीने 14234 धावा केल्या. यात त्याच्या 25 शतके आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे. संगकाराने त्याचा शेवटचा वनडे सामना 2015 च्या विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात खेळला.
3. रिकी पाँटिंग: आॅस्ट्रेलियाचा महान कर्णधार आणि खेळाडू म्हणून रिकी पाँटिंगला नावाजलं जातं. 2000 ते 2010 च्या काळात सचिनबरोबरच पाँटिंगनेही क्रिकेटवर राज्य केलं. या काळात त्याने आपला वेगळा ठसा उमटवला. तसेच याच काळात त्याने आॅस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवताना दोन विश्वचषक जिंकण्याचीही कामगिरी केली.
पाँटिंगने वेलिंगटन येथे द.आफ्रिकेविरुद्ध 15 फेब्रुवारी 1995 ला वयाच्या 20 व्या वर्षी वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आधुनिक शैलीतील पण तितक्याच शास्त्रशुद्ध फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.
त्याने त्याच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीत सचिन पाठोपाठ सर्वाधिक शतके करण्याचाही विक्रम केला. त्याने आॅस्ट्रेलिया आणि आयसीसीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 375 वनडे सामन्यात 42.03च्या सरासरीने 30 शतके आणि 82 अर्धशतकांच्या सहाय्याने 13704 धावा केल्या.
पाँटिंगने 2011 च्या विश्वचषकानंतर आॅस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोडले. तसेच वर्षभरानंतर लगेचच पाँटिंग आॅस्ट्रेलियाच्या वनडे संघातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्याने 19 फेब्रुवारी 2012 ला त्याचा शेवटचा वनडे सामना भारताविरुद्ध खेळला.
4. सनथ जयसूर्या: श्रीलंकेचा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून सनथ जयसूर्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरवात एक गोलंदाज म्हणून केली. पण काही दिवसातच त्याच्यातील फलंदाजी कौशल्यही सर्वांना पहायला मिळाले.
वनडेत 300 पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या जयसुर्याने वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जयसुर्याने 26 डिसेंबर 1989ला पहिला वनडे सामना खेळला.
श्रीलंकेकडून 21 वर्ष 184 दिवस वनडे क्रिकेट खेळणाऱ्या जयसुर्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 445 सामने खेळले आहेत. यात त्याने 28 शतके आणि 68 अर्धशतकांसह 32.36च्या सरासरीने 13430 धावा केल्या आहेत. 189 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
जयसुर्याने 28 जून 2011 ला शेवटचा वनडे सामना खेळला.
5. माहेला जयवर्धने: श्रीलंकेचा महान फलंदाज आणि कर्णधार माहेला जयवर्धने त्याच्या वैविध्यपूर्ण फलंदाजीने त्याची अनोखी ओळख निर्माण केली.
जयवर्धनेने श्रीलंकेकडून 20 व्या वर्षी 24 जानेवारी 1998ला झिम्बाब्वे विरुद्ध वनडे पदार्पण केले.
या सामन्यात त्याला फक्त एकच चेंडू खेळायला मिळाला. सुरवातीला परदेश दौऱ्यांवर अपयश आलेल्या जयवर्धनेने नंतर कामगिरीत सुधारणा करत वनडेत तब्बल 448 सामने खेळले.यात त्याने 33.37 च्या सरासरीने 19 शतके आणि 77 अर्धशतकांसह 12650 धावा केल्या.
सध्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या जयवर्धनेने संगकाराप्रमाणेच शेवटचा वनडे सामना 2015 च्या विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात 18 मार्च 2015ला खेळला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू